flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग १४ *क्लेशानी डोके वर काढू नये म्हणून अष्टांग योगाचे पालन योग्य ठरते* अज्ञान , अस्मिता , राग , द्वेष या क्लेशामुळे माणसाला मनस्ताप भोगावा लागतो हे आपण बघितले. मनुष्य जर आहे त्यात समाधानी राहिला तर तो अपेक्षा रहित होतो. त्यामुळे क्लेशांची तीव्रता कमी होते. अर्थातच नवीन काही मिळवण्याची माणसाला इच्छा असते आणि ते स्वाभाविकही आहे. ते मिळवण्यासाठी तो खटपट करत असतो. त्यावेळी त्याने हे लक्षात ठेवावे की , गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे पण फळाबाबत त्याने आग्रही न राहता ईश्वरी इच्छेनुसार जे मिळेल ते त्याने आनंदाने स्वीकारण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे क्लेशांमुळे होणारा मनस्ताप कमी होईल. तसं बघायला गेलं तर , कर्म केल्यावर ईश्वरी इच्छेनुसार जे फळ मिळते तेच माणसाला नाईलाजाने का होईना स्वीकारावे लागते परंतु यात तो असमाधानी असतो. त्यामुळे त्याला मानसिक त्रास होतो. तेच फळ जर ईश्वराने दिले आहे तर माझ्या हिताचेच असणार अशा विचाराने स्वीकारले तर ते केव्हाही भल्याचेच असते. यातून क्लेशांचा त्रास कमी होतो आणि आणखी मिळवण्यासाठी हुरूप येतो. आता उगीच कुणीतरी सांगतय म्हणून मिळालेले फल अपेक्षेनुसार नसले तरी हिताचं आहे म्हणून स्वीकारायला , त्यामागे काही ठोस कारण असल्याशिवाय मनुष्य तयार होत नाही. त्यादृष्टीने मिळालेले फल माणसाने समाधानाने का स्वीकारावे याबाबतची कारण मीमांसा अशी मांडता येईल की , आपण करत असलेल्या कर्माचे फल कोणते द्यायचे ते ईश्वराच्या हातात असते. दुसरे म्हणजे गीतेत सांगितल्याप्रमाणे ईश्वर आपला सोयरा आहे आणि सोयरा आपले कधी वाईट करू शकत नाही हे लक्षात घेऊन दिलेल्या फळातून आपले जास्तीतजास्त भले कसे होईल हेच तो पहात असतो. आत्ता मिळालेले फल आपल्याला अपेक्षेनुसार नसले तरी कालांतराने ते फल निश्चितच आपल्या हिताचे आहे असे लक्षात येते. तेव्हा ईश्वर आपले भलेच करणार , यावर डोळे मिटून विश्वास ठेवायला हरकत नाही. थोडक्यात , सतत काही ना काही मिळवण्यासाठी धडपड करणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्या धडपडीतून मिळणाऱ्या फळाकडे बघून मनस्ताप करून घ्यायचा की , समाधान मनायचे हे माणसाच्याच हातात असते. ह्याचाच अर्थ काहीही न करता स्वस्थ राह्यले तरी जीवनात जे घडणार आहे ते घडतच असते असाही लागू शकेल परंतु सामान्य मनुष्य स्वस्थ बसू शकत नाही. असे स्वस्थ बसणे केवळ साक्षात्कारी योग्यालाच शक्य होते कारण त्याला जे मिळालेले आहे त्यात तो तृप्त असतो त्यामुळे त्याला आयुष्यात नव्याने काहीही मिळवायचे नसते. अभिनिवेश या पाचव्या क्लेशाचे स्वरूप पुढील सूत्रात सांगितले आहे. स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढोऽभिनिवेशः॥९॥ अर्थ , मनुष्य शिकलेला असुदे किंवा नसुदे त्याच्याठिकाणी मी पणाची असलेली भावना निरंतर असावी असा जो दृढ संस्कार झालेला असतो त्याला अभिनिवेश असं म्हणतात. विवरण , सत्व , रज आणि तमोगुणाची साम्यावस्था ही आदर्श मानसिकता मानली जाते. तान्ह्या मुलाची अशी मानसिकता असते. त्यामुळे त्याच्या मनात हा आपला तो परका असा कोणताही भाव नसतो. सगळ्यांच्याकडे पाहून कोणत्याही अपेक्षेशिवाय ते खुदुखुदू हसत असते. संत मंडळींच्यात त्रिगुणांची साम्यावस्था आयुष्यभर टिकून असते त्यामुळे ते सगळ्यांशीच आपलेपणाने वागतात. सामान्य माणसाच्या स्वभावात मात्र रज व तम गुणांचे आधिक्य असते. सहाजिकच त्याच्यामध्ये सत्वगुण कमी असतो. त्यामुळे आत्म्याशी संबंधित वस्तू आणि सबंध नसलेली वस्तू तो ओळखू शकत नाही. या अज्ञानामुळेच आत्म्याशी संबंधित नसलेल्या स्वतःच्या शरीराला तो आत्म्याशी संबंधित आहे असे समजतो आणि मी म्हणजेच माझे शरीर हा त्याचा दृढ समज होतो. स्वतःच्या शरीराबद्दल अत्यंत प्रेम वाटत असल्याने , एखाद्या नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे अखंड वहात असतो त्याप्रमाणे आयुष्यभर हे शरीर अखंड टिकावे असा विचार सुशिक्षित , अशिक्षित अशा सगळ्यांच्याच मनात येत असतो हे विशेष ! आत्तापर्यंत आपण बघितलेले पाचही क्लेश म्हणजे त्रासदायक प्रवृत्ती चित्तात संस्कार रूपाने कायम हजर असतात आणि अनुकूलता प्राप्त झाली की , ते आपला प्रभाव दाखवतात. ह्या क्लेशांच्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन अवस्था असतात. ह्या दोन्ही अवस्थातील क्लेशांना कसे निष्प्रभ करावे ते मुनींनी पुढील दोन सूत्रातून सांगितले आहे. ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः॥१०॥ ध्यानहेयास्तद्वृत्तयः॥११॥ अर्थ , स्थूल क्लेशांचा त्यांच्या कारणात विलय करून त्यांना जिंकता येते तसेच सूक्ष्म क्लेश ध्यानाने नष्ट करता येतात. विवरण , अज्ञान , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश माणसाला मनस्ताप देत असतात. त्यापैकी अविद्या ह्या क्लेशामुळे नष्ट होणारी वस्तू टिकाऊ आहे असे मनुष्य समजतो. त्यात त्याच्या देहाचाही समावेश होतो. स्वतःचा देह कायम टिकावा आणि स्वतःच्या आवडत्या वस्तूही कायम टिकणाऱ्या आहेत असे त्याला वाटत असते. त्या वस्तू स्वतःजवळ असाव्यात अशी हवेपणाची भावना असते. प्रत्यक्षात आवडत्या वस्तू नष्ट होणाऱ्या असल्यामुळे , त्या नष्ट झाल्या की , त्या नष्ट करणाऱ्याचा तो द्वेष करतो. अविद्या , अस्मिता या सूक्ष्म क्लेशातून राग , द्वेष आणि अभिनिवेश हे स्थूल क्लेश माणसाच्या स्वभावात डोकावू लागतात. ते केव्हा डोकं वर काढतात ते वर सांगितले आहेच. म्हणून योगशास्त्र असे सांगते की , अविद्या , अस्मिता या सूक्ष्म क्लेशाना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी त्यांनी डोके वर काढू नये म्हणून योगशास्त्राने सांगितल्यानुसार यम , नियम इत्यादी आठ अंगाचे पालन करणे योग्य ठरते. क्रमशः

पातं योग साधनपाद भाग १३ *जो सपूर्ण क्लेशरहीत असतो तोच साक्षी होऊ शकतो* अज्ञान , अस्मिता आणि राग हे तीन प्रकारचे क्लेश आपण बघितले. क्लेशामुळे माणसाला मनस्ताप होऊन त्याचे मन ध्येयविषयापासून विचलित होत असते. हातचे काम सोडून मनुष्य त्याबद्दलच विचार करत बसतो. माणसाच्या मनाला ताप होण्याचे प्रमुख कारण म्हणजे , माणसाने एखाद्या वस्तूकडे , घटनेकडे किंवा व्यक्तीकडे ती आहे तशी न पाहता ती आपल्याला अनुकूल आहे असे समजून त्या वस्तूकडे बघणे. यातूनच गैरसमज निर्माण होतात. मी कर्ता आहे हाच मुळात आधी एक गैरसमज आहे आणि तोच सगळी सृष्टी आपल्याला अनुकूलच आहे किवा आपण ती आपल्याला अनुकूल करून घेऊ शकतो अशा आणखी एका गैरसमजाला जन्म देतो. वस्तुस्थितीकडे डोळसपणे न पाहिल्याने माणसाचे गैरसमज होतात. हे सर्व अज्ञानापोटी घडते. जो मनुष्य असलेली किंवा येणारी परिस्थिती आहे तशी स्वीकारून त्याबाबत कोणतीही तक्रार न करता पुढे जात असतो त्याच्या हे लक्षात येत असल्याने त्याचे गैरसमज कमी होतात. पुढील अस्मिता हा क्लेशही मी कर्ता आहे , मी म्हणेन तसंच झालं पाहिजे अशा विचारातूनच माणसाला मनस्ताप देत असतो. त्यापुढील क्लेशाचा प्रकार राग असा असून तो मिळणारी सुखे मला कायम मिळत राहावीत , त्यासाठी आवश्यक ती साधने कायम माझ्याजवळ हवीत अशा विचारातून जन्म घेत असतो. अर्थात परिस्थिती सारखी बदलत असल्याने एकच स्थिती कधीच टिकून रहात नाही पण मनुष्य या अज्ञानाकडे सोयीस्कर डोळेझाक करतो. यापुढील क्लेशाची निर्मिती द्वेषातून होते. त्याबद्दल मुनी सांगतात , दुःखानुषयी द्वेष: ।।८।। अर्थ , दुःखाचा अनुभव घेतल्यावर हे दुःख आणि त्यामागची कारणे याबाबतची प्रतिकूल भावना मनात तयार होते आणि त्याबद्दल द्वेष हा क्लेश निर्माण होतो. विवरण , कायम सुख असावे आणि दुःख कधीच वाट्याला येऊ नये या इच्छेतून सतत आपल्या मनासारखे घडावे म्हणून मनुष्य आटोकाट प्रयत्न करत असतो पण सर्वच गोष्टी माणसाच्या मनासारख्या कुठं घडतात ! नेमक्या याच गोष्टींमुळे मनुष्य काय होईल , कसं होईल या विचारांनी सतत चिंतेत असतो. त्यातून त्याला निरनिराळ्या प्रकारचे क्लेश होत असतात. सध्या आपण अभ्यासत असलेला द्वेष हा क्लेश दुःखाबद्दल व ते देणाऱ्या साधनांबद्दल मनात असणाऱ्या तिटकाऱ्यातून निर्माण होतो. अशावेळी माणसामध्ये , आपण कायम ऐश आरामात रहावं असा विचार देणारा रजोगुण प्रभावी असतो आणि तो नेहमीच माणसाला दुःखी करतो. वास्तविक पाहता सुख हेसुद्धा शेवटी दुःखच देत असते कारण सुख जरी मिळाले तरी ती वेळ निघून गेली की , ते संपते आणि मनुष्य त्याच्या आठवणीने दुःखी होतो. जर ते मिळाले नाही तरी तो दुःखी असतो. ही बाब लक्षात घेणाऱ्याची सुखाची ओढ कमी होत जाते. त्याचबरोबर ती सुखे न मिळाल्याने जे दुःख होते ते सहन करण्याची क्षमताही वाढत जाते. या दोन्हीमुळे तो मानसिकरित्या स्थिर होऊन त्याचा सुखदुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे मनाचे स्थिर होणे म्हणजे भोगासाठी धडपडण्याची खटपट कमी होऊन ते असले तर असुदेत , नसले तरी चालतील असे वाटू लागते. त्याला भोगापवर्गथा असे म्हणतात. विशेष म्हणजे परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करण्यास माणसाचं मन तयार व्हावं अशी ईश्वरी योजना त्रिगुणांच्या मार्फत कार्यरत असतेच परंतु त्यासाठी खूप कालावधी जावा लागतो म्हणून योगाभ्यासाच्या माध्यमातून शिस्तबद्धपणे जे प्रयत्न करतील त्यांच्या बाबतीत ही घटना लवकर घडते. योगाभ्यासाचा परिणाम होऊन सुखदुःखांच्याकडे साधक वेगळ्या दृष्टीने बघू लागतो. त्याच्या मानसिकतेत हळूहळू बदल होऊ लागतो. जे मिळेल त्यात तो सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. तसेच वाट्याला येणाऱ्या दुःखाना तो सहन करण्याचा प्रयत्न करतो. सुख कायम असावं व दुःख कधीच वाट्याला येऊ नये या दोन्हीसाठी वेळेनुसार कराव्या लागणाऱ्या पापाचरणाचा तो द्वेष करू लागतो तर सुखदुःखाकडे दुर्लक्ष करून होताहोईतो पुण्याचरण करण्याची त्याला ओढ लागते. पुण्याचरणाबद्दल त्याच्या मनात राग म्हणजे प्रेम उत्पन्न होते. अर्थातच सुखदुःखांकडे पुर्णपणे अलिप्त नजरेने पाहणे हे केवळ साक्षात्कारी व्यक्तीलाच शक्य असल्याने सुखाच्या प्राप्तीसाठी व दुःखांच्या निवृत्तीसाठी साधकाचे प्रयत्न सुरूच राहतात. त्यासाठी त्याला सहेतुक कर्म करावे लागते. त्यामुळे त्याला अधूनमधून राग आणि द्वेष या क्लेशांशी सामना करावा लागतो. यावरून असे म्हणता येईल की , जो संपूर्ण क्लेशरहित आहे तोच जीवनात घडणाऱ्या गोष्टींकडे स्वस्थ बसून , साक्षी म्हणून पाहू शकतो. क्रमशः

पातं योग साधनपाद भाग १२ *सुख आणि ते मिळवून देणारी साधने कायम माझ्यापाशी असावीत असे माणसाला वाटत असते* माणसाला मानसिक त्रास देणाऱ्या क्लेशांबद्दल आपण अधिक अभ्यास करत आहोत. अज्ञान , अस्मिता , राग ( प्रेम ) , द्वेष आणि अभिनिवेश या गोष्टी माणसाला क्लेश म्हणजे मानसिक त्रास किंवा मनस्ताप देत असतात. यातील अज्ञान म्हणजे वस्तू आहे तशी न दिसता आपल्याला हवी आहे तशी आहे असं वाटणं हे माणसाच्या अज्ञानाचं मूळ कारण आहे. एखादी वस्तू नाशवंत असेल तर ती कायम टिकणारी आहे असं वाटणं , अपवित्र वस्तू , विचार पवित्र वाटणं , अनात्म वस्तू आत्मरूप वाटणं अशा पद्धतीचं विपरीत ज्ञान होणं म्हणजे अविद्या होय. विशेष म्हणजे ही अविद्या हीच अस्मिता , प्रेम , द्वेष आणि अभिनिवेश या इतर चार क्लेशांची जननी आहे. त्यापैकी अस्मिता या क्लेशामुळे कसा मनस्ताप होतो हे पुढील सूत्रात सांगितले आहे. दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता ॥६॥ अर्थ , समोरची वस्तू बघणारा आणि ती काय आहे हे समजून घेण्यासाठी चैतन्य पुरवणारा या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत तरीही त्या एकरूप आहेत असे वाटून मी आहे असे वाटते तोच अस्मिता नावाचा क्लेश होय. विवरण , डोळ्यांनी एखादी वस्तू बघितली की , अमुक एक बघितले अशी माहिती डोळ्यामार्फत मनाकडे पोहोचवली जाते त्यानुसार त्या वस्तूबाबत मनात विचार येतात आणि त्यावर चित्तात चिंतन सुरू होते. अर्थात या सगळ्याला मिळणारी चालना जिवात्म्यातील चैतन्यशक्तीकडून दिली जाते. अशी सर्व प्रक्रिया सुरू असताना चित्त आणि जीवात्मा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असून एकरूप भासतात त्यामुळे मी देह आहे असे जिवात्म्याला वाटू लागते आणि हा विचार ठाम झाला की देहबुद्धी प्रबळ होते. कारखान्यातील मशिनरी विजेच्या शक्तीवर चालून त्यातून वस्तू निर्मिती करतात पण उद्या जर विजेला असे वाटू लागले की , मी वस्तूंची निर्मिती करते तर तिच्यात अहंभाव निर्माण झाला असे म्हणता येईल. त्याप्रमाणे चित्त आणि चैतन्य ही भिन्न असूनही चैतन्याला आपण चित्ताशी एकरूप आहोत असं वाटू लागतं. हे केवळ अज्ञानापोटी घडतं. या अज्ञानामुळे मी देह आहे असे चैतन्यरूपी जिवात्म्याला वाटू लागते. त्यातून तो सुखदुःखादी भोग भोगतो , अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकतो. अशा परिस्थितीत साधकाची योगाभ्यासात प्रगती होऊ लागली की , त्याच्या मनात येणाऱ्या विचारांचा ओघ कमीकमी होत जाऊन शेवटी थांबतो. त्यामुळे चित्त शांत होते. साधकाला प्रत्येक वस्तू प्रत्यक्षात आहे तशी दिसू लागते. त्यातच साधकाला आत्मसाक्षात्कार झाला की चित्त आणि चैतन्य वेगवेगळे आहेत हे स्पष्टपणे जाणवते. त्याच्या चित्ताचा लय आता पुरुषोत्तमात झालेला असतो परिणामी अस्मितेमुळे म्हणजे मी देह आहे असे समजल्याने , त्याला होणारे क्लेश नष्ट होतात. पुढील क्लेशदायक भावना रागाची आहे. एखाद्या गोष्टीच्या हवेपणामुळे मन अस्वस्थ होते असते असे मुनी म्हणतात. सुखानुशयी राग: ।। ७।। अर्थ , सुख मिळाल्यानंतर , हे सुख आणि ते मिळवून देणारी साधने मला नेहमी मिळावीत असे वाटणे हा राग नामक क्लेश होय. विवरण , सुख मिळवण्याचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ , डोळ्यांनी चांगले दृश्य बघितले की आनंद होणे , एखादा चविष्ट पदार्थ खाल्ला की तो चांगला लागणे , कानांनी गोड संगीत ऐकले की खुश होणे , एखाद्या वस्तूचा , व्यक्तीचा स्पर्श हवाहवासा वाटणे , अशी सुखे ज्ञानेंद्रियाच्या मार्फत मनुष्य मिळवत असतो. दुसऱ्या प्रकारात एखादी इच्छापूर्ती झाली म्हणजेही माणसाला सुख मिळते. स्वतःचे घर बांधणे , मुलामुलींचे शिक्षण पूर्ण होणे अशा पूर्णत्वाला जाण्यास थोड्याशा आवाक्याबरच्या गोष्टी घडून आल्या की , मनुष्य सुखी होतो. जेव्हा मनुष्य सुखी असतो , तेव्हा त्याच्या अंतःकरणात सत्वगुणाचे प्रमाण रज किंवा तमोगुणापेक्षा जास्त असते. सत्वगुण सुखसंगाला कारणीभूत ठरतो. हा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून लहान मुले वडील जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतात तेव्हा हव्या त्या वस्तू मागतात आणि त्यांना त्या मिळतातही कारण त्यावेळी वडलांच्यात सत्वगुणाचे आधिक्य असते. सत्वगुण माणसाला आनंदी ठेवतो आणि इतरांना आनंदी राहण्यास प्रोत्साहन देतो. असे सुख आणि ते मिळवून देणारी साधने कायम माझ्यापाशी असावीत असे माणसाला वाटत असते पण तसे नेहमीच घडते असे नाही म्हणून असे वाटणे हे इच्छित गोष्ट साध्य न झाल्याने क्लेशदायक ठरू शकते. क्रमशः

पातं योग साधनपाद भाग ११ *अज्ञानी मनुष्य अनात्म म्हणजे नाशवंत वस्तूला आत्मा समजून त्यावर जीव जडवून बसतो* अविद्या किंवा अज्ञान हा पहिला क्लेश असून , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश हे इतर चार क्लेश यातूनच निर्माण होतात. हे लक्षात घेऊन अविद्या म्हणजे काय हे आपण सविस्तर समजाऊन घेत आहोत. ज्या गोष्टी कायम टिकणाऱ्या नाहीत , त्या कायम टिकणाऱ्या आहेत असे समजून त्यांना अनावश्यक महत्व देणे , तसेच ज्या कायम टिकणाऱ्या आहेत तिकडे दुर्लक्ष करणे हे अविद्येचे पहिले लक्षण होय. दुसऱ्या लक्षणांमध्ये अपवित्र वस्तू पवित्र मानून तिला अत्यंत महत्व देणे आणि पवित्र वस्तूकडे दुर्लक्ष करणे याचा समावेश होतो. आपले शरीर बघितले तर अपवित्र वस्तुंचे भांडार आहे पण आपण त्याला पवित्र मानतो आणि अत्यंत पवित्र असलेल्या आत्म्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच मांसाहार अध्यात्मिक दृष्ट्या अपवित्र आहे पण त्याबद्दल काहीही विचार न करता जगात कित्येक लोक मांसाहार करतात. पृथ्वीतलावरील लोकसंख्येचा विचार केला असता मांसाहार अपवित्र आहे असे मानणारी माणसे फार थोडी असून त्यांची संख्या भांगेत तुळस म्हणावी इतकी कमी आहे , तरीही भारतात अध्यात्मिक मूल्यांचा आदर करणारी बरीच मंडळी असल्याने इतर देशांच्या तुलनेत मांसाहारी मंडळी कमी आढळतात. काही प्रजाती मांसाहार निषिद्ध मानतातच पण काही समाजात मांसाहार मान्य असला तरी अध्यात्मिक मूल्यांचे महत्व जाणणारी त्या समाजातली काही मंडळी मांसाहार अपवित्र मानतात. तसेच मांसाहार करणाऱ्या काही लोकांनाही मांसाहार अपवित्र आहे हे पटलेले आहे. इतर शारीरिक स्वच्छता करण्याचे महत्त्व पटले असूनसुद्धा ती बेफिकिरपणे वेळच्यावेळी न करणे , ही अपवित्रताच आहे हा सर्व अविद्येचाच भाग होय म्हणून साधकाने सर्वतोपरी दक्षता घेऊन वागावे म्हणजे अविद्येचे संस्कार क्षीण होऊन योगाभ्यास सुखकर होईल. दुःखदायक गोष्टी सुखाच्या आहेत असे मानणे ही अविद्येचे पुढील लक्षण होय. जोपर्यंत माणसाचे वागणे शारीरिक , वैचारिक आणि बौद्धिक मूल्यावर आधारित असते तोपर्यंत ते बहुधा स्वार्थमुलक असते , त्यामुळे त्यात भरमसाठ अपेक्षांचा समावेश असतो आणि त्यातून आपल्याला सुख मिळेल हा विचार असतो. वास्तविक पाहता अपेक्षा ठेऊन स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कोणत्याही कर्मामुळे सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या असं कधीच होत नाही कारण एक अपेक्षा पूर्ण झाली की , त्यातूनच दुसरी अपेक्षा प्रकट होते. त्यामुळे सुख मिळालंय असं वाटत असतानाच कधी ना कधी होणाऱ्या अपेक्षाभंगामुळे ते दुःखदायकच ठरते. वरवर पाहता ते सुखदायक वाटणाऱ्या गोष्टी , माणसाला पहाता पाहता दुःखी करतात म्हणून मुनी सांगतात की , मनुष्य दुःखदायक गोष्टींना सुखदायक मानतो ही अविद्या होय. अविद्येचे चौथे लक्षण म्हणजे अनात्म वस्तूला आत्मा मानणे. आत्मा , प्राण , जीव हे तसे समानार्थी शब्द आहेत. एखाद्याच्या बाबतीत आपण म्हणतो त्याचा जीव अमुक एका गोष्टीत वसलेला आहे किंवा लहान मुलांच्या गोष्टीतील राक्षसाचा प्राण पोपटाच्या डोळ्यात असतो , एखाद्याचा नातू त्याचा अगदी जीव की प्राण असतो पण गम्मत म्हणजे या सर्व गोष्टी आत्म्याशी सबंध नसलेल्या आहेत कारण त्या सर्व नाश पावणाऱ्या आहेत आणि आत्मा तर अविनाशी आहे , चैतन्ययुक्त असल्याने स्वयंप्रकाशी आहे. बाकी सर्व गोष्टी जड आणि परप्रकाशी असतात पण यातलं काहीच लक्षात न घेता अज्ञानी मनुष्य अनात्म म्हणजे नाशवंत वस्तूला आत्मा समजून त्यावर त्याचा जीव जडवून बसतो. ती मिळवताना तो आकाश पाताळ एक करतो. वस्तू मिळाली नाही की , दुःखी होतो आणि समजा मिळाली तरी कालांतराने ती नष्ट झाल्यावर दुःख्खच पदरात पडते म्हणून आत्म्याशी संबंधित नसलेल्या वस्तूला ती आत्म्याशी संबंधित आहे असे समजणे हे अज्ञान होय. म्हणून अनात्म वस्तू आणि आत्मवस्तुतील फरक उमजणे आवश्यक आहे. आत्मवस्तू ही कायम टिकणारी आहे ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेही सुखदायक आहे तसेच ती मिळाल्यावर कधीही नष्ट होण्याची किंवा कुणी हिरावून घेण्याची भीती नसल्याने नेहमी फक्त आनंद आणि आनंदच देत असते. क्रमशः

पातं योग साधनपाद भाग १० *वस्तू आहे अशी न वाटता वेगळीच वाटणे म्हणजे अविद्या होय* साधकाला जोपर्यंत भोगसाधनांची आवड असते तोपर्यंत ओढ , द्वेष इत्यादि क्लेशदायक अशुभ वासना प्रसुप्त , तनु विच्छिन्न आणि उदार अशा अवस्थात क्रमाने विकसित होत असतात. जेव्हा या क्लेशदायक वासनांमुळे दुःख्खच प्राप्त होते अशी खात्री झाल्यावर तो त्यांच्या पुर्ततेच्या बाबतीत उदासीन होतो आणि त्याचे त्याकडे दुर्लक्ष होऊ लागते. साधनेच्या प्रभावाने त्याच्या हातून सतकर्मे आपोआपच घडू लागतात आणि क्लेशदायक वासनांचा अधोगतिकडे प्रवास सुरू होतो. त्याची शक्ती कमी कमी होऊ लागते आणि त्या उदार अवस्थेतून क्रमाने विच्छिन्न , तनु आणि प्रसुप्त अवस्थेत जाऊन चित्तात संस्कारमात्र राहतात. साधकाने निर्विचार समाधी साध्य केली की , त्या संपूर्ण नष्ट होतात. साधकाचा मार्ग निष्कन्टक झाल्याने तो निर्वेधपणे असंप्रज्ञात समाधीत प्रवेश करतो आणि तेथे त्याला आत्मसाक्षात्कार होतो. अविद्यादी दुःखदायक क्लेश देणाऱ्या वासना कशा विकसित होतात आणि साधनेच्या प्रभावामुळे त्यांचे तळपट होऊन त्या संपूर्ण नष्ट कशा होतात यावर सविस्तर चर्चा आपण केली. आता पुढील पाच सूत्रात मुनी प्रत्येक क्लेशावर भाष्य केले आहे. अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या ॥५॥ अर्थ , अनित्य वस्तू नित्य वाटणे , अपवित्र असली तरी पवित्र वाटणे , दुःखरुप असून सुखरूप वाटणे , अनात्म असून आत्मा आहे असे वाटणे म्हणजे थोडक्यात वस्तू आहे अशी न वाटता वेगळ्या प्रकारची आहे असे वाटणे म्हणजे अविद्या होय. विवरण , सर्वसाधारणपणे मनुष्य शाळा कॉलेजातील शिक्षणाला विद्या समजतो पण प्रत्यक्षात ती केवळ माहिती असते. आध्यात्मिकदृष्ट्या विद्या किंवा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाशवंत म्हणजे अनित्य वस्तुंना मनुष्य नित्य म्हणजे कायम टिकणाऱ्या वस्तू असे समजून त्याचा सर्व व्यवहार चालू असतो. वास्तविक पाहता प्रत्येक वस्तूचे दुसऱ्या वस्तूत रूपांतर होण्याचे कार्य दिवसरात्र चालू असते. आपला देहही सतत बदलत असतो. काम करून थकलेल्या पेशींची जागा नवीन पेशी घेत असतात म्हणून आपला देहही अनित्यच आहे पण आपल्याला मात्र तो कायम टिकणारा वाटतो. ज्याप्रमाणे नदीचा जलप्रवाह कायम पुढे जात असतो पण आपल्याला मात्र ती कायम एकाच जागी असलेली नदी वाटते त्याप्रमाणे आपल्याला आपला देहही नित्य वाटतो. अपवित्र असलेल्या पदार्थाना पवित्र मानणे हीही अविद्याच होय. रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा , मल , मूत्र इत्यादि पदार्थांचा एकत्र केलेला गोळा म्हणजे देह. ह्या सर्व वस्तू तसं बघायला गेलं तर अपवित्र आहेत पण अशा देहाला पवित्र समजून आपण त्याचे किती लाड करत असतो आणि त्या उलट अत्यंत पवित्र , निर्मळ असलेल्या आत्म्याकडे आपले दुर्लक्ष होते.. त्यामुळे देह म्हणजे मी ही कल्पना उराशी बाळगून आपण आयुष्यभर वावरत असतो हीच अविद्या होय. शरीराच्या बाहेरच्या गोष्टीतील काही गोष्टी इतरांना अपवित्र वाटतात तर काहींना त्यात अपवित्रपणा जाणवत नाही. उदाहरणार्थ अंडी , मांस भक्षण करणे हे काही लोक अपवित्र मानतात तर काही लोक आवडीने त्यांचे भक्षण करतात. अशा प्रकरणी पवित्र काय आणि अपवित्र काय याचा निवाडा कसा करावा ? याबाबतीत असे म्हणता येईल की , अंडी , मांस खाणाऱ्या कुळात जन्म झाल्यामुळे , ते लहानपणापासून ते खात असल्याने त्यांना ते पदार्थ खाण्यास अपवित्र वाटत नाहीत. याबाबत पुढे असा विचार करता येईल की , अशा लोकांनी मागील जन्मी वाघ , सिहाच्या योनीत जन्म घेतलेला असल्याने त्या जन्मीचे संस्कार जागृत होऊन त्यांना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्याने त्या इच्छांची पूर्ती होत असते. म्हणजे मांसाहारापूरते तरी हे लोक वाघ सिहापेक्षा अधिक उत्क्रांत झालेले नसतात कारण मनोविकारांच्या आधीन होऊन कुणी मांसाहार करत असल्याचे दिसत नाहीत. ज्यांचे व्यवहार शारीरिक , वैचारिक आणि बौद्धिक मूल्यावर आधारित असतात ती एक ना अनेक कारणे देऊन मांसाहार करणे कसे योग्य आहे याचे समर्थन करत असताना दिसतात पण ज्यांच्यात अध्यात्मिक मूल्ये विकसित झालेली आहेत त्यांनी मात्र मांसाहार अपवित्र ठरवला आहे. क्रमशः

पातं योग साधनपाद भाग ९ *अध्यात्मिक मूल्ये निर्माण होताच शुभ वासनांचा प्रसार वाढत जातो* आपण हे जाणून घेतले आहे की , मनुष्याला अविद्या , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश या प्रकारात मोडणारे क्लेश होऊ लागले की , तो अस्वस्थ होतो. हे क्लेश माणसाच्या चित्तात , प्रसुप्त , तनु , विच्छिन्न किंवा उदार या चार अवस्थांपैकी कोणत्या तरी एका अवस्थेत असतात. त्या सर्व अवस्थांची माहितीही आपण घेतलेली आहे. त्यापैकी उदार अवस्थेत असलेल्या वासना अनुकूल परिस्थितीमुळे जागृत झालेल्या असतात.. मनुष्य सोडून इतर योनीतील वासनापूर्तीसाठी कर्मे फक्त शारीरिक मूल्यावर आधारित असतात तर मनुष्य योनीत शारीरिक आणि मानसिक म्हणजे भावभावनावर आधारित मूल्ये प्रभावी असतात. त्यामुळे दोन्ही मूल्यात मतभेद होत असल्याने बौद्धिक मूल्याच्या आधारे कर्माबाबत निर्णय घेतला जातो. माणसाची भोगलालसा सतत वाढती असते आता पुरे असे कधी त्याला वाटतच नाही. त्यात अडथळा आला तर क्रोध , द्वेष , मत्सर आदि मनोविकारांना आपण बळी पडू शकतो हे लक्षात आलेला मनुष्य आपल्याला समाधान कसे मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्या चिंतनातूनच त्याची बुद्धी विकसित होऊ लागते. ती एव्हढी विकसित होते की , त्याला अध्यात्मिक मूल्ये स्फुरू लागतात आणि त्याच्या असे लक्षात येते की , भोगातून तात्पुरता आनंद मिळत असला तरी , कायम टिकणारे समाधान भोगात नसून त्यासाठी इतर काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासठी त्याला साधुसंतांचा सहवास , धर्मग्रंथांचा अभ्यास करावा असे वाटू लागते आणि त्याचा प्रवास भोगाकडून मोक्षाकडे सुरू होतो. प्रारब्धानुसार आलेले भोग तो भोगतो पण त्यात त्याचे मन लागत नाही हा चित्तात वैराग्य सूर्याचा उदय होण्यापूर्वीचा उष:काल होय. यापूर्वी भोगवासना प्रबळ झाली आणि अपूर्ण राहिली तर क्रोध , मत्सर आदि मनोविकारांचा सामनाही करावा लागत असतो पण जसजशी अध्यात्मिक मूल्ये मनात रुजून जोम धरू लागतात , त्याप्रमाणात इंद्रियांचा व मनाचा संयम मनुष्य स्वेच्छेने करू लागतो. एव्हढेच नव्हे तर तो त्याची बुद्धी भोगाच्या पूर्तीसाठी न वापरता अध्यात्मिक विकास कसा होईल याकडे वापरू लागतो. त्यातून त्याच्या असे लक्षात येते की , विषयसुखातून दुःखाचीच निर्मिती होते आणि ते भोगावे लागते म्हणून नित्य सुखदायी आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेऊन ईश्वरात विलीन होणे हाच परम पुरुषार्थ होय. अध्यात्मिक मूल्ये सुस्थिर झाली की , मोक्षाची वासना जागृत होते आणि शुभ , अशुभ वासनांच्या झगड्याल प्रारंभ होतो आत्तापर्यंत शारीरिक , मानसिक आणि बौद्धिक मूल्यांमध्ये जास्तीतजास्त भोग कसे मिळतील हे पाहणे या मुद्द्यावर एकमत असल्याने झगड्याचा प्रश्न येत नाही. शुभशुभाची तेथे काहीच पर्वा नसते पण अध्यात्मिक मूल्ये निर्माण होताच शुभ वासनांचा प्रसार वाढत जातो त्यामुळे अशुभ वासना निष्प्रभ होऊ लागतात. त्याचा परिणाम होऊन शुभ वासनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न सुरू होतात परंतु अशुभ वासनांचा पगडा असा जबरदस्त असतो की , त्या शुभ वासनाना दडपू पाहतात. आत्तापर्यंत शुभ वासना तनु म्हणजे निर्माण होत असतात पण परिस्थिती अनुकूल नसल्याने त्या शांत झालेल्या असतात. आता अध्यात्मिक मूल्यात वाढ झाल्याने त्या विच्छिन्न अवस्थेत येतात. या अवस्थेतील वासना त्यांच्या पूर्तीसाठी परिस्थिती अनुकूल आहे का ? याची सतत चाचपणी करत असतात आणि अध्यात्मिक मूल्यात होत असलेल्या वाढीने ती अनुकूल होत आहे हे लक्षात आले की त्यांचा जोर इतका वाढतो की , साधकाच्या हातून सतत सतकर्मे घडू लागतात त्यामुळे अशुभ वासना , शुभ वासनांच्या रेट्यापुढे दबल्या जातात. हा रेटा पुढे एव्हढा वाढतो की , त्यामुळे अशुभ वासना अत्यंत दुरबल होतात. साधकाला त्यांची पूर्तता करण्याची इच्छा नाहीशीच झालेली असल्याने त्या चित्तात केवळ तनु अवस्थेत म्हणजे स्मृती रूपाने असतात आणि त्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही की , त्या प्रसुप्तावस्थेत जातात. या अवस्थेत त्यांचा चित्तावर कोणताच प्रभाव पडत नसल्याने त्या स्वतःहून कोणतीच क्रिया घडवू शकत नाहीत. साधकाने निर्विचार समाधी साध्य केली की , त्याच्याठिकाणी ऋतंभरा प्रज्ञा उत्पन्न होते आणि त्यामुळे त्याला योग्य काय व अयोग्य काय याची स्पष्ट जाणीव झाल्यामुळे प्रसुप्तावस्थेत असलेल्या भोगवासनांचे संस्कार पूर्णतया नामशेष होतात आणि त्या पुन्हा कधीही जागृत होऊ शकत नाहीत , त्यामुळे आत्मसाक्षात्काराच्या दिशेने कोणताही अडथळा न येता वाटचाल होऊ लागते. क्रमशः