flairkarts

Friday, 20 May 2016

श्रीनृसिंह जयंती नवरात्र

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे ***

* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ९ वे *

आज वैशाख शुद्ध चतुर्दशी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहराजांची जयंती  !! तुम्हां आम्हां श्रीनृसिंहपदसेवकांसाठी परम आनंदाचा दिन.
" न मे भक्त: प्रणश्यति ।" ही  साक्षात् भगवंतांची प्रतिज्ञा आहे. माझे भक्त कधीच नाश पावत नाहीत ! असे स्वत: भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभू गीतेत उच्चरवाने सांगतात. त्यांच्या त्या सत्यप्रतिज्ञेचेच साकार रूप म्हणजे हा परमकरुणामय श्रीनरहरी अवतार होय  !!
श्रीभगवंतांचे अत्यंत लाडके जर कोणी असतील तर ते केवळ त्यांचे अनन्य भक्तच असतात, हे त्रिवार सत्य आहे. त्यांचे जेवढे प्रेम आपल्या भक्तांवर असते, तेवढे स्वत:वरही नसते. जीवप्राणाने अनुसरणारे भक्त साक्षात् भगवंतांचे हृदय अधिष्ठाते असतात. एका क्षणासाठीही भगवंतांना त्यांचा विरह सहन होत नाही. भक्तांसाठी ते कोणत्याही थराला जाऊन कार्य करू शकतात. श्रीनृसिंह अवतार हे त्याचे समर्पक उदाहरण आहे. प्रल्हादजींसाठी भगवंतांनी नर व सिंहाचा एकत्रित अवतार धारण केला. ऐसा पूर्वी न ऐकिला न देखिला । हेच भगवंतांच्या परमप्रेमाचे द्योतक नव्हे काय?
भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे एक वैशिष्ट्य असते. श्रीरामावतारात मर्यादा तर श्रीकृष्णावतारात प्रेम हेच मुख्यप्राण आहेत. तसे या अभिनव नृसिंह अवतारात भक्तकरुणा किंवा भक्तवात्सल्य हेच प्रधान वैशिष्ट्य आहे. भक्तांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणे, हेच त्यांचे मुख्यब्रीद आहे. म्हणूनच खरेतर अत्यंत उग्र, भीषण, भयानक असला तरी हाच देवबाप्पा आम्हांला खूप जवळचा, हवाहवासा वाटतो.
भगवान श्रीकृष्ण व ऋषींच्या संवादातील एक श्रीनृसिंहस्तवराज स्तोत्र आहे. त्यात शेवटी प्रसन्न झालेले भगवान श्रीनृसिंह प्रकट होऊन एक विशेष वर देताना म्हणतात,
भो भो भक्तवरा: सर्वे श्रृणुध्वं वरमुत्तमम् ।
अहं भक्तपराधीनो अन्येषामतिदुर्लभ: ॥
" माझ्या सर्व श्रेष्ठ भक्तांनो, माझा उत्तम वरप्रसाद ऐका, मी माझ्या भक्तांच्या आधीन आहे, प्राप्त करून घ्यायला इतरांसाठी मात्र मी अत्यंत अवघड आहे  ! " येथे प्रत्यक्ष भगवान श्रीनृसिंहच आपल्या अवताराचे मार्मिक रहस्य स्वमुखाने सांगत आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउली या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
ऐसा अवतार नरहरी स्तंभामाझारी ।
भक्तां परोपरी धरी रूपें ॥१॥
धरूनिया महीत्व जाला नृसिंहरूप ।
वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु ।
वर्ण सारङ्गधरू निजरूप ॥३॥
" भक्तांच्या भल्यासाठीच हा नरहरी अवतार स्तंभामधून प्रकट झाला. अत्यंत भव्य-दिव्य अशा नृसिंह रूपात प्रकटलेले हे हरितत्त्व दुसरे तिसरे काही नसून वेदांनाही ज्याचा थांग कधी लागला नाही तेच साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहे. सकलकलानिधी भगवान श्रीकृष्ण हेच निजरूपातूनच पुन्हा श्रीनृसिंह झालेले आहेत. तेच माझे मायबाप, माझे परमहितैषी श्रीसद्गुरु देखील आहेत ! "
आपण गेले नऊ दिवस ज्या श्रीनृसिंह भगवंतांची ही शब्दपूजा बांधत आहोत, ते अहेतुकदयानिधी, भक्तहृत्कमलविहारी श्रीनृसिंहप्रभू या लेकुरवाचेने अर्पिलेल्या भातुकलीच्या नैवेद्याने संतुष्ट होऊन आपल्यावर कृपाप्रसाद करोत, हीच प्रेमभावना या शेवटच्या सांगतेच्या लेखात त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सर्वांच्या वतीने निवेदितो. गेले नऊ दिवस या निमित्ताने आपण कळत नकळत पण सतत भगवान श्रीनृसिंहदेवांच्या नित्य अनुसंधानातच आहोत, हे भाग्य काय थोडे आहे?
भगवान श्रीनृसिंहराज प्रभू हे किती दयाळू आहेत? याचे आजवर सर्वश्रेष्ठ अशा वेदांनाही वर्णन करणे शक्य झालेले नाही. श्रीनृसिंह पुराणात एक गमतीशीर कथा येते. एक आचारभ्रष्ट झालेला ब्राह्मण एकदा तीव्र कामवासनेने एका स्त्रीला घेऊन जंगलात जातो. तेथे कामक्रीडेसाठी त्याला एक पडकी जागा सापडते. तो ती स्वच्छ करतो व आपला कार्यभाग साधतो. त्याच्या लक्षातही येत नाही की ती पडकी जागा हे प्राचीन नृसिंह मंदिर असते. तेवढ्यातच त्याला मृत्यू येतो. पण अशा पापी जीवाला न्यायला जेव्हा यमदूत येतात तेव्हा त्यांना तेथेच पुण्य पावन विष्णुदूतही आलेले दिसतात. त्या दोघां दूतांमध्ये संवाद होतो व ते विष्णुदूत सांगतात की, या पापी भक्ताचे सर्व पाप केवळ एकदा नृसिंह मंदिराची स्वच्छता केल्याने भगवंतांनी नष्ट केलेले अाहे. तसेच त्याला विष्णुलोकाला आणण्याची भगवंतांची आज्ञाही आहे. तेव्हापासूनच नृसिंह उपासनेत मंदिराची स्वच्छता हा एक प्रभावी सेवा प्रकार रूढ झालेला आहे. आवळा घेऊन कोहळा देण्याचाच हा प्रकार नाही का? अल्पशा स्वार्थप्रेरित सेवेनेही भगवान श्रीनृसिंह संतुष्ट होऊन किती भरभरून फळ देतात पाहा. म्हणूनच त्यांच्याठायी विलसणा-या याच अद्वितीय करुणारसपूर्ण स्वभावाचे सर्व संत वारंवार वर्णन करतात.
आज त्या परमकारुणिक श्रीनरहरी अवताराची जयंती आहे. आजच्या सूर्यास्ताला हे करुणाब्रह्म पुन्हा अवतरणार आहे, आपल्यावर अपरंपार कृपावर्षाव करण्यासाठी ! म्हणून त्यांना अतिप्रिय असणा-या त्यांच्या सप्रेम स्मरणात आपण रममाण होऊया व श्रीनृसिंहजन्माचा आनंदोत्सव साजरा करूया.
आपल्या या लेखमालेचे शीर्षक ही भगवान श्रीमाउलींची एक ओवी आहे. त्यात ते भक्तवर प्रल्हादांची भगवंतांच्या तोंडून महती गातात की, त्या माझ्या लाडक्या भक्तासाठीच केवळ मी हे रूप धारण केलेले आहे. माझे हे नृसिंहरूप ' लेणे ' म्हणजेच अलंकार आहे. तोही मी माझ्या भक्ताचे माहात्म्य वाढविण्यासाठीच घातलाय. सुंदर दागिन्यांनी जशी मूळच्या सौंदर्यात आणखी वाढ होते, तसे या नृसिंहरूपामुळे षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीभगवंतांच्या गुणगणांमध्ये भक्तवात्सल्य या थोर गुणाचा प्रकर्षाने समावेश होऊन देवांचे गुणसौंदर्य आणखी वाढलेले आहे.
आईच्या प्रेमावर खरा हक्क तिच्या अबोध बाळाचाच असतो. तसे या भगवंतांच्या प्रेमावर तुम्हां आम्हां भक्तांचाच खरा हक्क आहे, फक्त आपण सर्वार्थाने आईला शरण जाऊन, ती ठेवेल तसे राहणारे, केवळ तिचीच आस असणारे बालक व्हायला हवे. हेच बालकत्व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांनी निरंतर जपले म्हणून अनावर, अपार असे उग्रभीषण नृसिंह भगवंत कायमचे त्यांचेच होऊन राहिले. ' प्रल्हादवरद ' असे नाव ते भगवंत आजही अभिमानाने मिरवीत आहेत. भक्तीचे अलौकिक श्रेष्ठत्व यापरते काय आणिक सांगणार?
आजच्या या पावन पर्वावर भक्ताग्रणी श्रीप्रल्हादजींच्या श्रीचरणीं आपण सर्वजण एकच मागणे मागूया की, " देव आपलासा कसा करावा? याचे यथार्थ ज्ञान आपण  कृपापूर्वक आमच्या हृदयात प्रतिष्ठापित करावे व भक्तकरुणाकर श्रीनृसिंह भगवंतांचा खरा आविर्भाव आमच्या हृदयकोशात करवून त्यांना कायमचे तेथेच स्थिर करावे. आपण त्यांच्यासाठी आहात व ते आपल्यासाठीच आहेत, म्हणून ते आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. तेव्हा आमची दया येऊ द्यावी व आम्हांलाही तुमच्यासारखी " नृसिंहजयंती " लवकरात लवकर साजरी करण्याची सुवर्णसंधी प्रदान करावी  !"
नृसिंहकवचात भगवान श्रीशंकर म्हणतात,
कुतो भीति: कुतो मृत्यु: कुतस्तस्य दरिद्रता ।
मृत्योर्मृत्यु: रमानाथो यस्य नाथो नृकेसरी ॥
भगवान श्रीनृसिंहांच्या भक्तांना ना मृत्यूची भीती ना दारिद्र्याची. मृत्यूचाही मृत्यू असणारे भगवान श्रीनृसिंह ज्यांचे स्वामी आहेत, त्यांच्या भाग्याची तुलना कशाशी करणार?
म्हणूनच आजच्या या नृसिंहजयंती पर्वावर श्रीसद्गुरुकृपेने गेले नऊ दिवस निर्माण झालेली ही नवविधा भक्तीरूपी सुगंधी श्वेत पुष्पे परमप्रेमादरे भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या श्रीचरणीं त्यांच्याच पावन नामाच्या गजरात समर्पूया व आत्मनिवेदन साधून धन्य होऊया  आणि ज्ञानी ऋषींनी स्तवराजात मागितलेलाच वरप्रसाद मागून भगवान श्रीनरहरीरायांच्या परममंगलमय श्रीचरणीं तुलसीदल रूपाने कायमचे विसावूया !!
यदि नोऽसि प्रसन्नस्त्वं देवदेव कृपानिधे ।
त्वमेव नितरां देहि त्वयि भक्तिं दृढां प्रभो ॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

श्रीनृसिंह जयंती नवरात्र

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे ***

* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ७ वे *

भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी प्रकटलेला हा " आवेश " अवतार मोठा विलक्षणच आहे. श्रीनृसिंह पुराणामध्ये भक्त प्रल्हाद व भगवंतांचा फार सुंदर आणि भावपूर्ण असा संवाद त्रेचाळिसाव्या अध्यायात आलेला आहे. भगवद् भक्तांचे अंत:करण किती वैशिष्ट्यपूर्ण असते, याचा सुखद प्रत्यय या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो.
हिरण्यकश्यपूने आपल्या दूतांना प्रल्हादाला नागबंधनात जखडून समुद्रात नेऊन टाकण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या राक्षसांनी प्रल्हादाला रात्रीच्या वेळी गाढ समाधी अवस्थेत असतानाच बांधून नेऊन समुद्रात टाकले. प्रल्हाद समाधीच्या आनंदसागरात रममाण असल्यामुळे त्यांना समजलेच नाही की आपण खा-या पाण्याच्या समुद्राच्या तळाशी पोचलेलो आहोत. समुद्रदेवानेच स्वत: प्रल्हादांना किना-यावर आणले. तोवर ते समाधीतून जागे झाले व त्यांचा समुद्रदेवाशी संवाद झाला. भगवंतांच्या साक्षात् दर्शनाची प्रल्हादांची तीव्र तळमळ जाणून समुद्राने त्यांना भगवंतांचे स्तुती-गान करण्याचा सल्ला दिला. प्रल्हाद तेथेच रात्रभर व्याकूळ अंत:करणाने भगवंतांना आळवत बसले.
शेवटी भगवान नारायणांनी त्यांना पहाटे प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यावेळी देवांनी अत्यंत प्रेमभराने प्रल्हादांना वर माग म्हटले. प्रल्हाद म्हणाले की, " देवा, मला तुमचे दर्शनच सतत हवे असते. ते मिळाल्यावर, त्यापेक्षा काय मोठे असे आणखी मागू? " देव म्हणाले की, तरीही काहीतरी मागच. त्यावर प्रल्हाद म्हणाले, " मला जन्मजन्मांतरी गरुडाप्रमाणे आपला दास करून ठेवा. " त्यावर देव म्हणाले, " काय कठीण समस्या ठेवलीस समोर? मीच मला तुला देऊन टाकायची, तुझ्याच स्वाधीन होण्याची इच्छा बाळगतोय आणि तुला माझे दास व्हायचे आहे. आणखी दुसरे काहीतरी माग. "
त्यावर भक्तश्रेष्ठ प्रल्हाद फार सुंदर म्हणतात, " देवा, वर द्यायचाच असेल तर, माझी आपल्या ठिकाणी सात्त्विक भक्ती सदैव स्थिर राहील, त्या भक्तीमुळे मी सतत तुमचे नाम-गुण-कीर्तीच गात राहीन, असाच वर द्या !" भगवंत आपल्या या श्रेष्ठ भक्तावर अतीव प्रसन्न झाले व त्यांनी तसाच वर त्याला दिला.
भक्तांचे अंत:करण कसे सर्वांगांनी भक्तिमय झालेले असते पाहा. त्यांना भक्तीशिवाय दुसरे काहीही सुचतच नाही. सर्वत्र त्यांना हरिरूपच दिसत असते व तेच सतत हवेहवेसेही वाटत असते. त्यासाठीच तर त्यांचा जन्म झालेला असतो. भगवान श्रीमाउली भक्तांच्या या अनन्य प्रीतीला गंगामैयाची उपमा देतात. ती गंगा समुद्राला काल मिळाली, आज मिळाली, नव्हे आत्ताही मिळतच आहे. तरीही नित्यनवीन प्रेमाने, उत्साहाने ती सतत समुद्राशी एकरूप होत असते. त्याचा तिला ना कंटाळा ना आळस. तसेच हे भक्तही भगवंतांशी एकरूप होऊनही पुन्हा पुन्हा तीच इच्छा करीत असतात. त्यांच्यासाठी तो अनुभव प्रत्येक क्षणी नवीनच असतो. हीच परम अद्भुत अशी अद्वैतीभक्ती होय.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादच या भक्तिसुखासाठी, रामावतारात अंगद, कृष्णावतारात उद्धव, माउलींच्या काळात भक्त श्रीनामदेव, नंतर श्रीतुकाराम महाराज, त्यानंतर श्रीतुकाविप्र महाराज व त्याहीनंतर चिदंबर महास्वामींचे शिष्य श्रीराजाराम महाराज म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेते झाले. शिवाय दक्षिणेत श्रीमत् राघवेंद्रस्वामी रूपानेही भक्तश्रेष्ठ प्रल्हादजीच अवतरले होते. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद व भगवान नरहरी ही पूर्ण एकरूप अशी थोर जोडगोळीच आहेत. भक्तिसुखासाठी प्रल्हादजी सतत पृथ्वीतलावर विविध रूपांनी अवतरित होऊन भक्तीचा आनंद लुटतात व लोकांनाही भरभरून देत असतात. या एकरस जोडगोळीच्या अम्लान चरणीं सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत करतो.
भगवान श्रीनृसिंहांविषयी अक्षरश: प्रचंड वाङ्मय पूर्वीच्या ऋषीमुनींनी व साधुसंतांनी रचून ठेवलेले आहे. यामध्ये नृसिंह अवताराच्या लीला, प्रल्हादादी नृसिंहभक्तांच्या कथा, नृसिंहविषयक स्तोत्रे, मंत्र, सहस्रनामे, मालामंत्र, पूजापद्धती, प्रार्थना स्तोत्रे अशाप्रकारचे विविध भाषांमधील विपुल प्रासादिक वाङ्मय पाहायला मिळते. हे सर्व एकत्रित स्वरूपात प्रथमच एकूण साडेसोळाशे पानांच्या तीन खंडात्मक " श्रीनृसिंह कोश " मधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्वात आनंददायक गोष्ट अशी की, हे ₹ ५७५ /- मूल्याचे तीन खंड सवलतीत केवळ ₹ ३०० /- मध्ये श्रीवामनराज प्रकाशन नृसिंहभक्तांना देत आहेत.
थोर नृसिंहभक्त प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली अनेक मान्यवर अभ्यासकांनी या कोशात मोलाचे योगदान दिलेले आहे. हे तीनही खंड प्रत्येक नृसिंहभक्ताच्या संग्रही असायलाच हवेत, इतके महत्त्वपूर्ण व विलक्षण आहेत.
प्रथम 'संहिता'खंडात वेद, उपनिषदे, स्मृती व पुराणांमधील नृसिंहविषयक संदर्भांची संहिता अाहे. ऋग्वेदातील ' द्वे विरूपे ' सूक्त, त्यावरील संस्कृत टीका व मराठी भाषांतर आहे. या सूक्ताचा नीरानृसिंहपूर स्थानाच्या दृष्टीने अर्थ केलेला आहे. श्रीनृसिंहपुराणाची देखील पूर्ण संहिता आहे.
द्वितीय 'उपासना'खंडात, वर ज्यातील सुंदर कथा सांगितली आहे त्या नृसिंहपुराणाचा मराठी अर्थ दिलेला अाहे. त्यानंतर शरभोपनिषद व लिंगपुराणातील नृसिंहदमन हा विलक्षण भाग सविस्तर चर्चिलेला आहे. प्रत्यक्ष उपासना खंडात नृसिंहविषयक ७५ संस्कृत व ४७ मराठी रचनांचा समावेश केलेला आहे. शिवाय प्रदीर्घ अशी नृसिंहार्चनपद्धती देखील दिलेली आहे.
तिस-या 'माहात्म्य'खंडात उपासनाखंडातील उर्वरित स्तोत्रे व नीरानृसिंहपूर क्षेत्राचे संस्कृत माहात्म्य व त्याचा मराठी अर्थ दिलेला आहे. परिशिष्टातील दहा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख हे तर या खंडाचे वैभवच म्हणायला हवे. या लेखांमधून नृसिंह उपासनेची परंपरा, मूर्तीशास्त्र, भारतातील नृसिंह क्षेत्रे यांवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. हे सर्व लेख नुसते माहितीपूर्णच नाहीत तर रंजकही झालेले आहेत. श्रीनृसिंह दैवताची सर्वांगीण ओळख करून देणारा हा कोश वाचकांबरोबरच अभ्यासकांसाठी व नृसिंह उपासकांसाठीही अतिशय महत्त्वाचा ठरतो. हे अपूर्व शब्दब्रह्म कृपया जरूर संग्रही ठेवा व अभ्यासा,  ही माझी कळकळीची प्रार्थना आहे. हा कोश १९९६ सालीच प्रकाशित झालेला असल्याने आता फार थोड्याच प्रती शिल्लक आहेत. असे प्रचंड महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा पुन्हा होत नसतात, तेव्हा त्वरा करून हे अल्पमूल्यात उपलब्ध झालेले अद्भुत धन प्राप्त करून घ्यावे, ही विनंती. कोश हवा असल्यास श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांना 02024356919 क्रमांकावर किंवा माझ्या खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क करावा, ही विनंती.
आजच्या वैशाख शुद्ध द्वादशी तिथीचे आणखी एक महान वैशिष्ट्य म्हणजे, आजच भक्तश्रेष्ठ अंबरीष राजासाठी, भगवान महाविष्णूंनी दुर्वास ऋषींचा दहा वेळा गर्भवासाला जाण्याचा शाप आपल्यावर घेऊन आपले भक्तवात्सल्य व भक्ताभिमान पुन्हा एकदा दाखवून दिला होता. हेच भगवान विष्णूंचे दशावतार होत. हा प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी घडला. त्यामुळे आज श्रीभगवंतांचीही जयंती साजरी केली जाते.