flairkarts
- Dec 16 (1)
- Dec 18 (2)
- Dec 21 (1)
- Dec 22 (2)
- Dec 30 (2)
- Jan 04 (1)
- Jan 13 (1)
- Apr 24 (3)
- May 04 (2)
- May 20 (10)
- May 26 (1)
- May 27 (2)
- May 28 (1)
- Aug 30 (1)
- Sept 11 (2)
- Nov 26 (1)
- Mar 16 (1)
- Mar 25 (1)
- Jul 31 (1)
- Sept 08 (1)
- Jan 17 (1)
- May 28 (1)
- Dec 30 (1)
- Jun 21 (1)
- Jul 06 (1)
- Sept 09 (1)
- Nov 17 (1)
- Nov 22 (1)
- Mar 17 (2)
- May 11 (1)
- May 12 (6)
Friday, 27 May 2016
सागरा प्राण तळमळला....!
"सागरा प्राण तळमळला..!"
ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे.
त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते - जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य - पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय वाटत असला तरीही त्याचे नाव ऐकताच त्या किनाऱ्यावरील एकूणएक ब्रिटीशांमध्ये धावपळ माजली असती! त्याचे नाव? त्याचे नाव होते - विनायक दामोदर सावरकर!
हो तेच ते सावरकर, जे इंग्रजांच्या राजधानीत राहून त्याच इंग्रजांचे जुलमी साम्राज्य उखडण्यासाठी बॉम्ब बनवून भारतात पाठवत होते! हो तेच ते सावरकर, ज्यांनी नुकताच कर्झन वायलीचा वध करणाऱ्या मदनलाल धिंग्राविरुद्धची निषेधसभा हाणून पाडली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी ती सभा उधळल्यानंतर वृत्तपत्रांना पत्रे पाठवून सगळ्यांचीच तोंडे कायदेशीररित्या बंद करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी अटकेत असलेल्या धिंग्राचे ब्रिटिशांनी दाबून टाकलेले निवेदन प्रसिद्धवून इंग्रजांची त्यांच्याच देशात पार नाचक्की करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, जे शत्रूच्या शिबिरात राहून त्याच शत्रूच्या शत्रूंशी संधान बांधून होते! हो तेच ते सावरकर, ज्यांना 'ग्रेज इन'ने 'बॅरिस्टर' पदवी देऊ केली होती, परंतू 'ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घ्यावी लागणार असेल तर मला तुमच्या पदव्या नकोत' असे ज्यांनी त्या संस्थेच्या चालकाला सुनावले होते! हो तेच ते सावरकर जे..! असो!!
पण तेच सावरकर आज फिरताना शांत वाटत होते. नेहमी तर किती काय काय बोलत असतात. नवनवीन गोष्टी सांगत असतात. निरंजनला कळेचना! काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी बोलायचा प्रयत्न केला,
"आज हवा छान आहे नाही"?
उत्तरादाखल सावरकरांनी त्यांच्याकडे नुसतंच पाहिलं. मग हळूहळू एक-एक शब्द उच्चारत म्हणाले,
"निरंजन, मला कळत नाही, असा अजून किती काळ तुझ्यावर ओझं बनून राहायचं मी.."
"ओझं? अहो काय बोलता सावरकर? तुमचं ओझं का होणार आहे मला? अहो, तुम्ही लंडनमध्ये जो पराक्रम करून दाखवला आहे तो शतकानुशतकांतून कुणीतरी एखादाच करून दाखवतो. अहो, नायक आहात तुम्ही आम्हां भारतीयांचे. बॅरिस्टर झाला असता, तर ऐश्वर्यात लोळला असता अक्षरश:, परंतू केवळ देशजननीपायी क्रांतिचा खडतर मार्ग स्वीकारणारे तुम्ही.. अहो सारे इंग्रज तुम्हाला आतंकवादी समजत होते, इंग्लंडच्या त्या तसल्या भयानक हवामानात तुम्हाला कुणी छप्परही द्यायला तयार नव्हते, तेव्हा तुम्ही काय अपेष्टा काढल्यायत त्याच्या कथा बाबांनी (बिपिनचंद्र पाल) सांगितल्यावर तर मी तुमचा पार भक्तच झालो आहे. म्हणूनच तर आपण समवयीन असूनही आणि तुम्ही इतक्या वेळा बजावलेलं असूनही तुम्हाला 'अरे-तुरे' करावंसं वाटलं नाही कधी मला. अहो, इंग्रजांच्या ससेमिऱ्याममुळे तुमची तब्येत ढासळलीये आणि डॉक्टरांनी तुम्हाला हवेत बदल सुचवलाय हे बाबांकडून कळल्याबरोब्बर तुम्हाला इकडे माझ्याकडे पाठवून द्यावं असा हट्टच धरला मी त्यांच्यापाशी! तुमची तब्येत सुधारावी या परमार्थासोबतच, तुमच्यासारख्या महापुरुषाकडून चार गोष्टी शिकता आल्या तर सोने होईल माझ्या आयुष्याचे, हा स्वार्थही होताच त्यापाठी! आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही माझ्यावर ओझे आहात..?"
सावरकर काही न बोलता नुसतेच खाली पाहात चाललेले. काही क्षण तसेच शांततेत गेले. धीर करून निरंजनच परत म्हणाले,
"आज तुम्ही एवढे गप्प का..?"
काहीही न बोलता सावरकरांनी एवढा वेळ हातात घट्ट दाबून धरलेला, चुरगळलेला कागदाचा तुकडा पुढे केला. निरंजनने हातात घेऊन पाहिला, तर ती तार होती - सावरकरांचा लहानगा मुलगा प्रभाकर वारल्याची!
निरंजनच्या डोळ्यांत पाणी तरळले. सावरकरबंधू क्रांतिकार्यात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या कुटूंबाला काय काय जाच सहन करावा लागतोय हे इंग्लंडमध्ये साऱ्यांना ठाऊक होते. इंग्रजांनी घरा-दारावर जप्ती आणली होती. बंधू नारायण लहान. त्याला कित्येकदा पोलिस चौकीच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. क्वचित मारहाणही झालेली. कुणीच आसरा द्यायला तयार नाही. दोन स्त्रिया - माई आणि येसूवहिनी - त्यांच्या पदरी मुलं - मात्र इंग्रजांच्या भीतीपायी त्यांना साधा आसरा द्यायलाही कुणी तयार होईना. माहेरी गेल्या तरी राहायची सोय नाही. स्वत:च्या माहेरी, त्या हक्काच्या घरीदेखील अक्षरश: गायींच्या गोठ्यात राहून दिवस काढत होत्या त्या. त्यांच्या आईवडलांचं काळीज रोज तिळ-तिळ तुटायचं, पण इंग्रजांपुढे त्यांचाही नाईलाज होता - न जाणो, पोरीच्या डोक्यावरचं आहे-नाही ते छप्परही जायचं! त्यात ही प्रभाकर गेल्याची तार..
निरंजनचे मन आतल्याआत आक्रंदू लागले, "परमेश्वरा, तू या जगात नाहीसच का रे? का या देवमाणसांवर असे जुलूम करतोयस? अरे, स्वत:साठी का काही मागताहेत ते? सारं तर देऊन टाकलं त्यांनी मातृभूमीला? का असे भोग त्यांच्या नशिबात?"
निरंजनने नजर वर करून पाहिलं. ज्या सावरकरांवर हा दु:खाचा हिमालय कोसळलेला ते स्वत: मात्र किनाऱ्यावर मौज करणाऱ्या एका कुटुंबाकडे टक लावून पाहात होते. आई-बाबा-मुलगा-मुलगी.. लहानसंच चौकोनी कुटूंब! काय विचार करत असतील सावरकर? आपलंही कुटूंब असंच असू शकलं असतं - हे वाटत असेल का त्यांना? ऐन तारुण्यात ज्या पत्नीला एकटं सोडून आलो, त्या पत्नीची आठवण येत असेल का त्यांना? की नुकताच ज्याचा मृत्यू झालाय त्या आपल्या लहानग्याच्या बाललीला आठवत असतील त्यांना? निरंजन सावरकरांच्या डोळ्यांचं निरीक्षण करत होते. चालता चालता आपण समुद्राच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, याचेही भान राहिले नव्हते त्यांना. बघता-बघताच, रमणीच्या गळ्यातील मोतीमाळ तुटावी आणि सारे मौल्यवान मोती इतस्ततः विखुरावेत तसे, अगदी तस्सेच दोन चुकार अश्रू पापण्यांची तटबंदी ओलांडून सावरकरांच्या गालावर ओघळले. सावरकरांचा चेहरा वेदनेने अक्षरशः पिळवटून निघाला. वाटले.. वाटले आता ते हुंदका देणार..
हुंदका आला, पण वेगळ्याच रुपाने. धीरोदात्त वीराला शोभेलसा. सावरकर कापऱ्या, अस्फुट आवाजात गाऊ लागले होते..
"ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला.."
त्या ऐतिहासिक गीताच्या जन्माचे एकमेव मानवी साक्षीदार - निरंजन - अवाक् होऊन गेला होते. ते दैवी काव्य ऐकावे की त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळावे, काही कळतच नव्हते!
एक निरंजन होते, जो नुसताच पाहात होते!
एक सावरकर होते, जे देहभान हरपून समुद्राला साद घालित होते!!
एक परदास्यमदाने उन्मत्त समुद्र होता.. निर्दयपणे फेसाळत हसणारा!
आणि होते सावरकरांचे अश्रू.. ज्यांनी गाणे पूर्णच होऊ दिले नाही.. काळ तेवढा बिचारा थांबून राहिला होता!!
- © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख/सावरकर-कथा वाचण्यासाठी, लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आयोजित करण्यासाठी भेट द्या - www.vikramedke.com)