flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग १४ *क्लेशानी डोके वर काढू नये म्हणून अष्टांग योगाचे पालन योग्य ठरते* अज्ञान , अस्मिता , राग , द्वेष या क्लेशामुळे माणसाला मनस्ताप भोगावा लागतो हे आपण बघितले. मनुष्य जर आहे त्यात समाधानी राहिला तर तो अपेक्षा रहित होतो. त्यामुळे क्लेशांची तीव्रता कमी होते. अर्थातच नवीन काही मिळवण्याची माणसाला इच्छा असते आणि ते स्वाभाविकही आहे. ते मिळवण्यासाठी तो खटपट करत असतो. त्यावेळी त्याने हे लक्षात ठेवावे की , गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे पण फळाबाबत त्याने आग्रही न राहता ईश्वरी इच्छेनुसार जे मिळेल ते त्याने आनंदाने स्वीकारण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे क्लेशांमुळे होणारा मनस्ताप कमी होईल. तसं बघायला गेलं तर , कर्म केल्यावर ईश्वरी इच्छेनुसार जे फळ मिळते तेच माणसाला नाईलाजाने का होईना स्वीकारावे लागते परंतु यात तो असमाधानी असतो. त्यामुळे त्याला मानसिक त्रास होतो. तेच फळ जर ईश्वराने दिले आहे तर माझ्या हिताचेच असणार अशा विचाराने स्वीकारले तर ते केव्हाही भल्याचेच असते. यातून क्लेशांचा त्रास कमी होतो आणि आणखी मिळवण्यासाठी हुरूप येतो. आता उगीच कुणीतरी सांगतय म्हणून मिळालेले फल अपेक्षेनुसार नसले तरी हिताचं आहे म्हणून स्वीकारायला , त्यामागे काही ठोस कारण असल्याशिवाय मनुष्य तयार होत नाही. त्यादृष्टीने मिळालेले फल माणसाने समाधानाने का स्वीकारावे याबाबतची कारण मीमांसा अशी मांडता येईल की , आपण करत असलेल्या कर्माचे फल कोणते द्यायचे ते ईश्वराच्या हातात असते. दुसरे म्हणजे गीतेत सांगितल्याप्रमाणे ईश्वर आपला सोयरा आहे आणि सोयरा आपले कधी वाईट करू शकत नाही हे लक्षात घेऊन दिलेल्या फळातून आपले जास्तीतजास्त भले कसे होईल हेच तो पहात असतो. आत्ता मिळालेले फल आपल्याला अपेक्षेनुसार नसले तरी कालांतराने ते फल निश्चितच आपल्या हिताचे आहे असे लक्षात येते. तेव्हा ईश्वर आपले भलेच करणार , यावर डोळे मिटून विश्वास ठेवायला हरकत नाही. थोडक्यात , सतत काही ना काही मिळवण्यासाठी धडपड करणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्या धडपडीतून मिळणाऱ्या फळाकडे बघून मनस्ताप करून घ्यायचा की , समाधान मनायचे हे माणसाच्याच हातात असते. ह्याचाच अर्थ काहीही न करता स्वस्थ राह्यले तरी जीवनात जे घडणार आहे ते घडतच असते असाही लागू शकेल परंतु सामान्य मनुष्य स्वस्थ बसू शकत नाही. असे स्वस्थ बसणे केवळ साक्षात्कारी योग्यालाच शक्य होते कारण त्याला जे मिळालेले आहे त्यात तो तृप्त असतो त्यामुळे त्याला आयुष्यात नव्याने काहीही मिळवायचे नसते. अभिनिवेश या पाचव्या क्लेशाचे स्वरूप पुढील सूत्रात सांगितले आहे. स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढोऽभिनिवेशः॥९॥ अर्थ , मनुष्य शिकलेला असुदे किंवा नसुदे त्याच्याठिकाणी मी पणाची असलेली भावना निरंतर असावी असा जो दृढ संस्कार झालेला असतो त्याला अभिनिवेश असं म्हणतात. विवरण , सत्व , रज आणि तमोगुणाची साम्यावस्था ही आदर्श मानसिकता मानली जाते. तान्ह्या मुलाची अशी मानसिकता असते. त्यामुळे त्याच्या मनात हा आपला तो परका असा कोणताही भाव नसतो. सगळ्यांच्याकडे पाहून कोणत्याही अपेक्षेशिवाय ते खुदुखुदू हसत असते. संत मंडळींच्यात त्रिगुणांची साम्यावस्था आयुष्यभर टिकून असते त्यामुळे ते सगळ्यांशीच आपलेपणाने वागतात. सामान्य माणसाच्या स्वभावात मात्र रज व तम गुणांचे आधिक्य असते. सहाजिकच त्याच्यामध्ये सत्वगुण कमी असतो. त्यामुळे आत्म्याशी संबंधित वस्तू आणि सबंध नसलेली वस्तू तो ओळखू शकत नाही. या अज्ञानामुळेच आत्म्याशी संबंधित नसलेल्या स्वतःच्या शरीराला तो आत्म्याशी संबंधित आहे असे समजतो आणि मी म्हणजेच माझे शरीर हा त्याचा दृढ समज होतो. स्वतःच्या शरीराबद्दल अत्यंत प्रेम वाटत असल्याने , एखाद्या नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे अखंड वहात असतो त्याप्रमाणे आयुष्यभर हे शरीर अखंड टिकावे असा विचार सुशिक्षित , अशिक्षित अशा सगळ्यांच्याच मनात येत असतो हे विशेष ! आत्तापर्यंत आपण बघितलेले पाचही क्लेश म्हणजे त्रासदायक प्रवृत्ती चित्तात संस्कार रूपाने कायम हजर असतात आणि अनुकूलता प्राप्त झाली की , ते आपला प्रभाव दाखवतात. ह्या क्लेशांच्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन अवस्था असतात. ह्या दोन्ही अवस्थातील क्लेशांना कसे निष्प्रभ करावे ते मुनींनी पुढील दोन सूत्रातून सांगितले आहे. ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः॥१०॥ ध्यानहेयास्तद्वृत्तयः॥११॥ अर्थ , स्थूल क्लेशांचा त्यांच्या कारणात विलय करून त्यांना जिंकता येते तसेच सूक्ष्म क्लेश ध्यानाने नष्ट करता येतात. विवरण , अज्ञान , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश माणसाला मनस्ताप देत असतात. त्यापैकी अविद्या ह्या क्लेशामुळे नष्ट होणारी वस्तू टिकाऊ आहे असे मनुष्य समजतो. त्यात त्याच्या देहाचाही समावेश होतो. स्वतःचा देह कायम टिकावा आणि स्वतःच्या आवडत्या वस्तूही कायम टिकणाऱ्या आहेत असे त्याला वाटत असते. त्या वस्तू स्वतःजवळ असाव्यात अशी हवेपणाची भावना असते. प्रत्यक्षात आवडत्या वस्तू नष्ट होणाऱ्या असल्यामुळे , त्या नष्ट झाल्या की , त्या नष्ट करणाऱ्याचा तो द्वेष करतो. अविद्या , अस्मिता या सूक्ष्म क्लेशातून राग , द्वेष आणि अभिनिवेश हे स्थूल क्लेश माणसाच्या स्वभावात डोकावू लागतात. ते केव्हा डोकं वर काढतात ते वर सांगितले आहेच. म्हणून योगशास्त्र असे सांगते की , अविद्या , अस्मिता या सूक्ष्म क्लेशाना अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी त्यांनी डोके वर काढू नये म्हणून योगशास्त्राने सांगितल्यानुसार यम , नियम इत्यादी आठ अंगाचे पालन करणे योग्य ठरते. क्रमशः

No comments:

Post a Comment