flairkarts

Friday, 12 May 2023

पातं योग साधनपाद भाग १२ *सुख आणि ते मिळवून देणारी साधने कायम माझ्यापाशी असावीत असे माणसाला वाटत असते* माणसाला मानसिक त्रास देणाऱ्या क्लेशांबद्दल आपण अधिक अभ्यास करत आहोत. अज्ञान , अस्मिता , राग ( प्रेम ) , द्वेष आणि अभिनिवेश या गोष्टी माणसाला क्लेश म्हणजे मानसिक त्रास किंवा मनस्ताप देत असतात. यातील अज्ञान म्हणजे वस्तू आहे तशी न दिसता आपल्याला हवी आहे तशी आहे असं वाटणं हे माणसाच्या अज्ञानाचं मूळ कारण आहे. एखादी वस्तू नाशवंत असेल तर ती कायम टिकणारी आहे असं वाटणं , अपवित्र वस्तू , विचार पवित्र वाटणं , अनात्म वस्तू आत्मरूप वाटणं अशा पद्धतीचं विपरीत ज्ञान होणं म्हणजे अविद्या होय. विशेष म्हणजे ही अविद्या हीच अस्मिता , प्रेम , द्वेष आणि अभिनिवेश या इतर चार क्लेशांची जननी आहे. त्यापैकी अस्मिता या क्लेशामुळे कसा मनस्ताप होतो हे पुढील सूत्रात सांगितले आहे. दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता ॥६॥ अर्थ , समोरची वस्तू बघणारा आणि ती काय आहे हे समजून घेण्यासाठी चैतन्य पुरवणारा या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत तरीही त्या एकरूप आहेत असे वाटून मी आहे असे वाटते तोच अस्मिता नावाचा क्लेश होय. विवरण , डोळ्यांनी एखादी वस्तू बघितली की , अमुक एक बघितले अशी माहिती डोळ्यामार्फत मनाकडे पोहोचवली जाते त्यानुसार त्या वस्तूबाबत मनात विचार येतात आणि त्यावर चित्तात चिंतन सुरू होते. अर्थात या सगळ्याला मिळणारी चालना जिवात्म्यातील चैतन्यशक्तीकडून दिली जाते. अशी सर्व प्रक्रिया सुरू असताना चित्त आणि जीवात्मा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असून एकरूप भासतात त्यामुळे मी देह आहे असे जिवात्म्याला वाटू लागते आणि हा विचार ठाम झाला की देहबुद्धी प्रबळ होते. कारखान्यातील मशिनरी विजेच्या शक्तीवर चालून त्यातून वस्तू निर्मिती करतात पण उद्या जर विजेला असे वाटू लागले की , मी वस्तूंची निर्मिती करते तर तिच्यात अहंभाव निर्माण झाला असे म्हणता येईल. त्याप्रमाणे चित्त आणि चैतन्य ही भिन्न असूनही चैतन्याला आपण चित्ताशी एकरूप आहोत असं वाटू लागतं. हे केवळ अज्ञानापोटी घडतं. या अज्ञानामुळे मी देह आहे असे चैतन्यरूपी जिवात्म्याला वाटू लागते. त्यातून तो सुखदुःखादी भोग भोगतो , अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकतो. अशा परिस्थितीत साधकाची योगाभ्यासात प्रगती होऊ लागली की , त्याच्या मनात येणाऱ्या विचारांचा ओघ कमीकमी होत जाऊन शेवटी थांबतो. त्यामुळे चित्त शांत होते. साधकाला प्रत्येक वस्तू प्रत्यक्षात आहे तशी दिसू लागते. त्यातच साधकाला आत्मसाक्षात्कार झाला की चित्त आणि चैतन्य वेगवेगळे आहेत हे स्पष्टपणे जाणवते. त्याच्या चित्ताचा लय आता पुरुषोत्तमात झालेला असतो परिणामी अस्मितेमुळे म्हणजे मी देह आहे असे समजल्याने , त्याला होणारे क्लेश नष्ट होतात. पुढील क्लेशदायक भावना रागाची आहे. एखाद्या गोष्टीच्या हवेपणामुळे मन अस्वस्थ होते असते असे मुनी म्हणतात. सुखानुशयी राग: ।। ७।। अर्थ , सुख मिळाल्यानंतर , हे सुख आणि ते मिळवून देणारी साधने मला नेहमी मिळावीत असे वाटणे हा राग नामक क्लेश होय. विवरण , सुख मिळवण्याचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ , डोळ्यांनी चांगले दृश्य बघितले की आनंद होणे , एखादा चविष्ट पदार्थ खाल्ला की तो चांगला लागणे , कानांनी गोड संगीत ऐकले की खुश होणे , एखाद्या वस्तूचा , व्यक्तीचा स्पर्श हवाहवासा वाटणे , अशी सुखे ज्ञानेंद्रियाच्या मार्फत मनुष्य मिळवत असतो. दुसऱ्या प्रकारात एखादी इच्छापूर्ती झाली म्हणजेही माणसाला सुख मिळते. स्वतःचे घर बांधणे , मुलामुलींचे शिक्षण पूर्ण होणे अशा पूर्णत्वाला जाण्यास थोड्याशा आवाक्याबरच्या गोष्टी घडून आल्या की , मनुष्य सुखी होतो. जेव्हा मनुष्य सुखी असतो , तेव्हा त्याच्या अंतःकरणात सत्वगुणाचे प्रमाण रज किंवा तमोगुणापेक्षा जास्त असते. सत्वगुण सुखसंगाला कारणीभूत ठरतो. हा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून लहान मुले वडील जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतात तेव्हा हव्या त्या वस्तू मागतात आणि त्यांना त्या मिळतातही कारण त्यावेळी वडलांच्यात सत्वगुणाचे आधिक्य असते. सत्वगुण माणसाला आनंदी ठेवतो आणि इतरांना आनंदी राहण्यास प्रोत्साहन देतो. असे सुख आणि ते मिळवून देणारी साधने कायम माझ्यापाशी असावीत असे माणसाला वाटत असते पण तसे नेहमीच घडते असे नाही म्हणून असे वाटणे हे इच्छित गोष्ट साध्य न झाल्याने क्लेशदायक ठरू शकते. क्रमशः

No comments:

Post a Comment