flairkarts

Saturday, 28 May 2016

Mother's Love

Mother's Love

Baby giraffes never go to school. But they learn a very important lesson rather early in life. A lesson that all of us would do well to remember. The birth of a baby giraffe is quite an earth-shaking event. The baby falls from its mother's womb, some eight feet above the ground. It shrivels up and lies still, too weak to move. The mother giraffe lovingly lowers her neck to smooch the baby giraffe. And then something unbelievable happens. She lifts her long leg and kicks the baby giraffe,
sending it flying up in the air and tumbling down on the ground. As the baby lies curled up, the mother kicks the baby again and again until the baby giraffe, still trembling and tired, pushes its limbs and for the first time learns to stand on its feet. Happy to see the baby standing on its own feet, the mother giraffe comes over and gives it yet another kick. The baby giraffe falls one more time, but now quickly recovers and stands up.

Mama Giraffe is delighted. She knows that her baby has learnt an important lesson: Never mind how hard you fall, always remember to pick yourself up and get back on your feet.

Why does the mother giraffe do this? She knows that lions and leopards love giraffe meat. So unless the baby giraffe quickly learns to stand and run with the pack, it will have no chance of survival.

Most of us though are not quite as lucky as baby giraffes. No one teaches us to stand up every time we fall. When we fail, when we are down, we just give up. No one kicks us out of our comfort zone to remind us that to survive and succeed, we need to learn to get back on our feet.

This msg goes out to each and everyone who hasn't given up and those who will always have the courage to get back , dust everything off and start again 😊

Friday, 27 May 2016

Shri Savarkar

सागरा प्राण तळमळला....!

"सागरा प्राण तळमळला..!"

ब्रायटन गावातली ती सायंकाळ तशी नेहमीसारखीच तर होती. तेच वातावरण, तीच पक्ष्यांची किलबिल, तीच फिरायला आलेली कुटूंबे.. क्वचित काही प्रेमी जोडपी.. आणि नित्यनेमाने फिरायला येणारे तेच दोघे. दोन काळे तरुण. त्या वर्तमान खेडेगावाच्या दृष्टीने काहीसे दुर्लक्षित, परंतू इतिहासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत महत्वाचे.

त्यांच्यापैकी एकाचे नाव होते निरंजन पाल. आणि कुणाला सांगून खरे वाटले नसते की, जो दुसरा मुळचा अतिशय रुपवान परंतू सध्या आजाराने खंगून गेल्यासारखा वाटणारा पंचविशीतला तरुण होता त्याने आत्ता काही दिवसांपूर्वीच ज्या साम्राज्यावरून म्हणे कधी सूर्य मावळत नाही ते - जगद्व्यापी ब्रिटीश साम्राज्य - पार मुळापासून हादरवून सोडले होते. तो जरी सध्या अतिशय कृश, अक्षरश: मरणप्राय वाटत असला तरीही त्याचे नाव ऐकताच त्या किनाऱ्यावरील एकूणएक ब्रिटीशांमध्ये धावपळ माजली असती! त्याचे नाव? त्याचे नाव होते - विनायक दामोदर सावरकर!

हो तेच ते सावरकर, जे इंग्रजांच्या राजधानीत राहून त्याच इंग्रजांचे जुलमी साम्राज्य उखडण्यासाठी बॉम्ब बनवून भारतात पाठवत होते! हो तेच ते सावरकर, ज्यांनी नुकताच कर्झन वायलीचा वध करणाऱ्या मदनलाल धिंग्राविरुद्धची निषेधसभा हाणून पाडली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी ती सभा उधळल्यानंतर वृत्तपत्रांना पत्रे पाठवून सगळ्यांचीच तोंडे कायदेशीररित्या बंद करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, ज्यांनी अटकेत असलेल्या धिंग्राचे ब्रिटिशांनी दाबून टाकलेले निवेदन प्रसिद्धवून इंग्रजांची त्यांच्याच देशात पार नाचक्की करून टाकली होती! हो तेच ते सावरकर, जे शत्रूच्या शिबिरात राहून त्याच शत्रूच्या शत्रूंशी संधान बांधून होते! हो तेच ते सावरकर, ज्यांना 'ग्रेज इन'ने 'बॅरिस्टर' पदवी देऊ केली होती, परंतू 'ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घ्यावी लागणार असेल तर मला तुमच्या पदव्या नकोत' असे ज्यांनी त्या संस्थेच्या चालकाला सुनावले होते! हो तेच ते सावरकर जे..! असो!!

पण तेच सावरकर आज फिरताना शांत वाटत होते. नेहमी तर किती काय काय बोलत असतात. नवनवीन गोष्टी सांगत असतात. निरंजनला कळेचना! काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी बोलायचा प्रयत्न केला,

"आज हवा छान आहे नाही"?

उत्तरादाखल सावरकरांनी त्यांच्याकडे नुसतंच पाहिलं. मग हळूहळू एक-एक शब्द उच्चारत म्हणाले,

"निरंजन, मला कळत नाही, असा अजून किती काळ तुझ्यावर ओझं बनून राहायचं मी.."

"ओझं? अहो काय बोलता सावरकर? तुमचं ओझं का होणार आहे मला? अहो, तुम्ही लंडनमध्ये जो पराक्रम करून दाखवला आहे तो शतकानुशतकांतून कुणीतरी एखादाच करून दाखवतो. अहो, नायक आहात तुम्ही आम्हां भारतीयांचे. बॅरिस्टर झाला असता, तर ऐश्वर्यात लोळला असता अक्षरश:, परंतू केवळ देशजननीपायी क्रांतिचा खडतर मार्ग स्वीकारणारे तुम्ही.. अहो सारे इंग्रज तुम्हाला आतंकवादी समजत होते, इंग्लंडच्या त्या तसल्या भयानक हवामानात तुम्हाला कुणी छप्परही द्यायला तयार नव्हते, तेव्हा तुम्ही काय अपेष्टा काढल्यायत त्याच्या कथा बाबांनी (बिपिनचंद्र पाल) सांगितल्यावर तर मी तुमचा पार भक्तच झालो आहे. म्हणूनच तर आपण समवयीन असूनही आणि तुम्ही इतक्या वेळा बजावलेलं असूनही तुम्हाला 'अरे-तुरे' करावंसं वाटलं नाही कधी मला. अहो, इंग्रजांच्या ससेमिऱ्याममुळे तुमची तब्येत ढासळलीये आणि डॉक्टरांनी तुम्हाला हवेत बदल सुचवलाय हे बाबांकडून कळल्याबरोब्बर तुम्हाला इकडे माझ्याकडे पाठवून द्यावं असा हट्टच धरला मी त्यांच्यापाशी! तुमची तब्येत सुधारावी या परमार्थासोबतच, तुमच्यासारख्या महापुरुषाकडून चार गोष्टी शिकता आल्या तर सोने होईल माझ्या आयुष्याचे, हा स्वार्थही होताच त्यापाठी! आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही माझ्यावर ओझे आहात..?"

सावरकर काही न बोलता नुसतेच खाली पाहात चाललेले. काही क्षण तसेच शांततेत गेले. धीर करून निरंजनच परत म्हणाले,

"आज तुम्ही एवढे गप्प का..?"

काहीही न बोलता सावरकरांनी एवढा वेळ हातात घट्ट दाबून धरलेला, चुरगळलेला कागदाचा तुकडा पुढे केला. निरंजनने हातात घेऊन पाहिला, तर ती तार होती - सावरकरांचा लहानगा मुलगा प्रभाकर वारल्याची!
निरंजनच्या डोळ्यांत पाणी तरळले. सावरकरबंधू क्रांतिकार्यात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या कुटूंबाला काय काय जाच सहन करावा लागतोय हे इंग्लंडमध्ये साऱ्यांना ठाऊक होते. इंग्रजांनी घरा-दारावर जप्ती आणली होती. बंधू नारायण लहान. त्याला कित्येकदा पोलिस चौकीच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. क्वचित मारहाणही झालेली. कुणीच आसरा द्यायला तयार नाही. दोन स्त्रिया - माई आणि येसूवहिनी - त्यांच्या पदरी मुलं - मात्र इंग्रजांच्या भीतीपायी त्यांना साधा आसरा द्यायलाही कुणी तयार होईना. माहेरी गेल्या तरी राहायची सोय नाही. स्वत:च्या माहेरी, त्या हक्काच्या घरीदेखील अक्षरश: गायींच्या गोठ्यात राहून दिवस काढत होत्या त्या. त्यांच्या आईवडलांचं काळीज रोज तिळ-तिळ तुटायचं, पण इंग्रजांपुढे त्यांचाही नाईलाज होता - न जाणो, पोरीच्या डोक्यावरचं आहे-नाही ते छप्परही जायचं! त्यात ही प्रभाकर गेल्याची तार..

निरंजनचे मन आतल्याआत आक्रंदू लागले, "परमेश्वरा, तू या जगात नाहीसच का रे? का या देवमाणसांवर असे जुलूम करतोयस? अरे, स्वत:साठी का काही मागताहेत ते? सारं तर देऊन टाकलं त्यांनी मातृभूमीला? का असे भोग त्यांच्या नशिबात?"

निरंजनने नजर वर करून पाहिलं. ज्या सावरकरांवर हा दु:खाचा हिमालय कोसळलेला ते स्वत: मात्र किनाऱ्यावर मौज करणाऱ्या एका कुटुंबाकडे टक लावून पाहात होते. आई-बाबा-मुलगा-मुलगी.. लहानसंच चौकोनी कुटूंब! काय विचार करत असतील सावरकर? आपलंही कुटूंब असंच असू शकलं असतं - हे वाटत असेल का त्यांना? ऐन तारुण्यात ज्या पत्नीला एकटं सोडून आलो, त्या पत्नीची आठवण येत असेल का त्यांना? की नुकताच ज्याचा मृत्यू झालाय त्या आपल्या लहानग्याच्या बाललीला आठवत असतील त्यांना? निरंजन सावरकरांच्या डोळ्यांचं निरीक्षण करत होते. चालता चालता आपण समुद्राच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत, याचेही भान राहिले नव्हते त्यांना. बघता-बघताच, रमणीच्या गळ्यातील मोतीमाळ तुटावी आणि सारे मौल्यवान मोती इतस्ततः विखुरावेत तसे, अगदी तस्सेच दोन चुकार अश्रू पापण्यांची तटबंदी ओलांडून सावरकरांच्या गालावर ओघळले. सावरकरांचा चेहरा वेदनेने अक्षरशः पिळवटून निघाला. वाटले.. वाटले आता ते हुंदका देणार..

हुंदका आला, पण वेगळ्याच रुपाने. धीरोदात्त वीराला शोभेलसा. सावरकर कापऱ्या, अस्फुट आवाजात गाऊ लागले होते..

"ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला.."

त्या ऐतिहासिक गीताच्या जन्माचे एकमेव मानवी साक्षीदार - निरंजन - अवाक् होऊन गेला होते. ते दैवी काव्य ऐकावे की त्या महापुरुषाच्या चेहऱ्यावरचे तेज न्याहाळावे, काही कळतच नव्हते!

एक निरंजन होते, जो नुसताच पाहात होते!

एक सावरकर होते, जे देहभान हरपून समुद्राला साद घालित होते!!

एक परदास्यमदाने उन्मत्त समुद्र होता.. निर्दयपणे फेसाळत हसणारा!

आणि होते सावरकरांचे अश्रू.. ज्यांनी गाणे पूर्णच होऊ दिले नाही.. काळ तेवढा बिचारा थांबून राहिला होता!!

- © विक्रम श्रीराम एडके.
(लेखकाचे अन्य लेख/सावरकर-कथा वाचण्यासाठी, लेखकाने दिलेली व्याख्याने ऐकण्यासाठी/आयोजित करण्यासाठी भेट द्या - www.vikramedke.com)

Thursday, 26 May 2016

चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ

*** चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ ***

आज वैशाख कृष्ण पंचमी, भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींच्या शिष्य प्रभावळीतील, नावाप्रमाणेच विशुद्ध, चोख विभूतिमत्व असणा-या श्रीसंत चोखामेळा महाराजांची आज पुण्यतिथी आहे.
पंढरपुरातील थोर हरिभक्त संतांच्या यादीत श्रीसंत चोखामेळा महाराजांचे नाव अग्रणी आहे. ते श्रीसंत नामदेवरायांचे शिष्योत्तम होते. श्रीनामदेवांच्या कुटुंबाप्रमाणेच, श्रीचोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, पुत्र कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेव्हणा बंका असे सारे पूर्ण हरिरंगी रंगलेले भगवद् भक्तच होते. काय त्या अलौकिक काळाच्या भाग्याचे वर्णन करणार? अठरा पगड जातीतील सगळे संत त्या काळात माउलींच्या छत्रछायेत नवनवीन उत्साहाने भक्तीचा डांगोरा पिटत होते. मोठ्या आनंदाने हरिभक्तीत रममाण झालेले होते.  या सर्व संतांचा चोखोबांना भरपूर सहवास लाभला आणि त्यांनी या अक्षर सहवासाचे खरोखरीच सोने केले. त्याच्या बळावर अनंत असा परमात्मा हृदयी पूर्णपणे धारण केला.
संतांचा आणि त्यांच्या प्रेममत्त, भावपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास हा लौकिक मोजपट्ट्यांनी आणि अननुभूत काल्पनिक निकषांच्या कमकुवत आधारावर कधीच करायचा नसतो. किंबहुना तसा जर अभ्यास केला तर तो अभ्यास न होता केविलवाणा कल्पनाविलासच अधिक ठरतो; आणि ती शब्दांची वायफळ कसरत ' बोलाचीच कढी बोलाचाच भात ' होऊन शेवटी ख-या आनंदाची भूक अतृप्तच राहाते.
श्रीसंत चोखोबारायांच्या बाबतीत अनेक अभ्यासकांची हीच गफलत झालेली दिसून येते. ते हिरीरीने तत्कालीन विषम जातिव्यवस्थेचा चोखोबांना व त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास झाला, याची त्यांच्या तसे वर्णन असणा-या एखाददुस-या अभंगाचा आधार घेऊन निरर्थक मांडणी करीत बसतात. पण त्या भानगडीत चोखोबांच्या चोख सोन्यासारख्या खणखणीत आत्मानुभूतीचा आस्वाद घ्यायचे, त्यांच्या अद्भुत अंतरंग प्रचिती-प्राजक्ताचा संपन्न फुलोरा पाहायचे, त्याचा तो स्वर्गीय सुगंध आतबाहेर अनुभवायचे साफ विसरूनच जातात. चोखोबारायांची ही जगावेगळी, विलक्षण आत्मप्रचितीच जर पाहायची राहिली तर मग बघितले तरी काय? वेळ वायाच घालवला नाही का?पंचपक्वान्नांचे ताट समोर वाढलेले असताना केवळ ताक पिऊन उठल्यासारखेच आहे हे. पण भगवंतांच्याच प्रेरणेने काही महाभागांच्या नशीबी तेच लिहिलेले असते. आपण मात्र भरपेट जेवावे, हेच बरे. ज्या लौकिक गोष्टींची चोखोबांनी उभ्या आयुष्यात कधीही तमा बाळगली नाही, आपल्या स्वानंदामृताला  असल्या कोणत्याच मर्त्य गोष्टींचा विटाळ होऊ दिला नाही, त्याच फक्त जर आम्ही धरून बसलो व त्यावरच जर मांडणी करीत बसलो, तर तो चोखोबांचा व त्यांच्या वैभवसंपन्न शब्दब्रह्माचा, त्यांच्या रोकड्या आत्मप्रचितीचा घोर अपमानच ठरेल. म्हणून त्यांच्या या प्रारब्धजन्य भागाचा आपण विचार टाळून केवळ चोखोबांच्या नावाप्रमाणेच चोख विभूतिमत्त्वाचाच विचार करूया.
त्यांची अभंगरचना खूप सुंदर आणि निगूढ योगानुभूती सहजपणे सांगणारी आहे. त्यांच्या निर्मळ, प्रेमरंगी रंगलेल्या भाविक अंत:करणाचे आरस्पानी प्रतिबिंब त्यांच्या अभंगांमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळते. त्या काळातील आश्चर्यच म्हणावे पण, अनंतभट नावाच्या पंढरीतीलच एका ब्राह्मण भक्ताने चोखोबांची सर्व अभंगरचना लिहून ठेवून आपल्यावर फार मोठे उपकारच केलेले आहेत.
श्रीचोखोबा सद्गुरुकृपेने आलेली मनोहर ज्ञानानुभूती सुरेख शब्दांत वर्णिताना म्हणतात,
देहीं देखिली पंढरी ।
आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तो हा पांडुरंग जाणा ।
शांति रुक्मिणी निजांगना ॥२॥
आकारलें तितुके नासे ।
आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायीं ।
चोखामेळा जडला पायी ॥७६.४॥
कोण म्हणेल की, असली भन्नाट योगानुभूती सांगणारा महात्मा लौकिक जगात निरक्षर होता? अहो, अक्षर परब्रह्माचा साक्षात्कार झालेलाच खरा " साक्षर " असतो. सगळ्या जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे, या भ्रमात राहणारे बाकी आपल्यासारखेच सगळे खरेतर निरक्षर म्हणायला हवेत !!!
सोयराबाई, कर्ममेळा, निर्मळा, बंका या सगळ्यांचेच अभंग खूप सुंदर आणि अद्भुत योगानुभूती सांगणारे आहेत. हे सर्वजण श्रीचोखोबांचे अनुगृहीत होते. श्रीसोयराबाईंचा दैवी स्वानुभव मांडणारा एक अभंग तर सर्वांनाच माहीत आहे, तो म्हणजे, " अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥ "  या श्रीरंगी सप्रेम रंगलेल्या सोयराबाईंचे बाळंतपण स्वत: भगवान पंढरीनाथांनी व श्रीमुक्ताबाईंनी मिळून केले होते. केवढे अलौकिक भाग्य  !! त्या बाळंतपणात जन्मलेले कर्ममेळा हेही संतच झाले, यात नवल ते काय? म्हणूनच श्रीचोखोबा व त्यांच्या अवतारी परिवार सदस्यांचे अभंग-अमृत प्रत्येक भक्ताने आपल्या आयुष्यात एकदातरी प्रेमाने वाचून, जाणून घेऊन आकंठ प्राशन केलेच पाहिजे. 
चोखोबा पंढरीत महारकी करत असत. त्यांच्या प्रेमाखातर, त्यांचा सहवास लाभावा म्हणून, प्रत्यक्ष पंढरीनाथ भगवान त्यांच्यासोबत गावात मेलेली गुरे ओढून नेऊन त्यांची विल्हेवाट लावत असत. अशी आख्यायिका संत आपल्या अभंगात सांगतात की, एकदा स्वर्गीचे अमृत विटले. ते पुन्हा कसे शुद्ध करायचे? असा गहन प्रश्न इंद्रादी देवतांसमोर पडला. त्यावर भगवंतांनी उपाय सांगितला की, " पंढरीत जाऊन आमच्या स्मरणात निरंतर निमग्न होऊन राहिलेल्या चोखोबांचा स्पर्श त्या अमृताला करवून आणा, ते तत्काळ शुद्ध होईल. " भगवंतांच्या आज्ञेने इंद्रदेवांनी पंढरीत येऊन चोखोबांची प्रार्थना करून अमृत पुन्हा शुद्ध करवून नेले. किती गंमत आहे पाहा, लौकिक जगात ज्यांना " अस्पृश्य " मानून मूर्ख समाज दूर ठेवत होता, ज्यांच्या अंगावरचा वारा लागला तरी विटाळ मानत होता, त्या चोखोबांच्या केवळ एका स्पर्शासाठी अलौकिक जगात अहमहमिका लागलेली होती  !! भगवद्भक्तांच्या निर्मल यशाचे, सर्वगुणसंपन्न महिम्याचे हे अद्भुत दर्शन स्तिमित करणारेच आहे.
एकदा पंढरपूर जवळच्या मंगळवेढा गावांत गांवकुसाची भिंत बांधण्यासाठी पंढरीतले सगळे महार मजूर नेण्यात आले होते. ती अर्धवट बांधलेली भिंत अचानक पडल्याने त्याखाली चिरडले जाऊन श्रीचोखोबांचा आजच्या तिथीला लौकिक अर्थाने मृत्यू होऊन ते भगवंतांशी पूर्ण एकरूप झाले.
पण भगवान पंढरीनाथांना आपल्या या लाडक्या भक्ताचा विरह काही सहन होईना, म्हणून त्यांनी श्रीनामदेवांना पाठवून चोखोबांच्या अस्थी आणायला सांगितल्या. त्या कशा ओळखणार? असे नामदेवांनी विचारल्यावर देव म्हणाले की, " ज्या अस्थींमधून विठ्ठलनाम ऐकू येईल, त्या अस्थी नि:संशय माझ्या चोख्याच्याच समज. " आपल्या अनन्य भक्ताची केवढी खात्री आहे पाहा देवांना. मेला तरी त्याची निर्जीव हाडे सुद्धा निरंतर नामच घेत असतील, असे ते भगवंत आवर्जून सांगत आहेत. नामदेवरायांनी त्यानुसार त्या अस्थी बरोबर शोधून आणल्या. भगवान पंढरीनाथांना चोखोबांचे इतके प्रेम होते की, लहान बाळाला कुशीत घ्यावे त्याप्रमाणे देवांनी अतीव प्रेमभराने त्या अस्थी आपल्या उपरण्यात घेतल्या व स्वहस्ते त्यांना मंदिराच्या महाद्वारासमोरच समाधी दिली, लाडका भक्त सतत डोळ्यांसमोर राहावा म्हणून ! त्यावर स्थापन झालेल्या समाधिशिलेचीच आजही पूजा होत असते. ही घटना वैशाख वद्य त्रयोदशीला संपन्न झाली. आजही पंढरी भूवैकुंठातील भगवान पंढरीनाथांच्या दरबारात आणि आपल्या सद्गुरूंच्या, श्रीनामदेवरायांच्या पायरीच्या समोरच श्रीचोखोबा अढळपदी विराजमान होऊन निरंतर विठ्ठलनाम घेताना दिसतात. त्यांच्या अपूर्व गुरुभक्तीचा याहून मोठा सन्मान काय असेल बरे?
अंतर्बाह्य चोख, सोन्यासारखा शुद्ध, लखलखीत आणि श्रीभगवंतांशी अखंड एकरूप होऊन राहिलेला म्हणजेच " चोखा-मेळा " ! अशा या थोर भगवद् भक्ताच्या पावन पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत  !!

Friday, 20 May 2016

श्रीनृसिंह जयंती नवरात्र

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे ***

* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ९ वे *

आज वैशाख शुद्ध चतुर्दशी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहराजांची जयंती  !! तुम्हां आम्हां श्रीनृसिंहपदसेवकांसाठी परम आनंदाचा दिन.
" न मे भक्त: प्रणश्यति ।" ही  साक्षात् भगवंतांची प्रतिज्ञा आहे. माझे भक्त कधीच नाश पावत नाहीत ! असे स्वत: भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभू गीतेत उच्चरवाने सांगतात. त्यांच्या त्या सत्यप्रतिज्ञेचेच साकार रूप म्हणजे हा परमकरुणामय श्रीनरहरी अवतार होय  !!
श्रीभगवंतांचे अत्यंत लाडके जर कोणी असतील तर ते केवळ त्यांचे अनन्य भक्तच असतात, हे त्रिवार सत्य आहे. त्यांचे जेवढे प्रेम आपल्या भक्तांवर असते, तेवढे स्वत:वरही नसते. जीवप्राणाने अनुसरणारे भक्त साक्षात् भगवंतांचे हृदय अधिष्ठाते असतात. एका क्षणासाठीही भगवंतांना त्यांचा विरह सहन होत नाही. भक्तांसाठी ते कोणत्याही थराला जाऊन कार्य करू शकतात. श्रीनृसिंह अवतार हे त्याचे समर्पक उदाहरण आहे. प्रल्हादजींसाठी भगवंतांनी नर व सिंहाचा एकत्रित अवतार धारण केला. ऐसा पूर्वी न ऐकिला न देखिला । हेच भगवंतांच्या परमप्रेमाचे द्योतक नव्हे काय?
भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे एक वैशिष्ट्य असते. श्रीरामावतारात मर्यादा तर श्रीकृष्णावतारात प्रेम हेच मुख्यप्राण आहेत. तसे या अभिनव नृसिंह अवतारात भक्तकरुणा किंवा भक्तवात्सल्य हेच प्रधान वैशिष्ट्य आहे. भक्तांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणे, हेच त्यांचे मुख्यब्रीद आहे. म्हणूनच खरेतर अत्यंत उग्र, भीषण, भयानक असला तरी हाच देवबाप्पा आम्हांला खूप जवळचा, हवाहवासा वाटतो.
भगवान श्रीकृष्ण व ऋषींच्या संवादातील एक श्रीनृसिंहस्तवराज स्तोत्र आहे. त्यात शेवटी प्रसन्न झालेले भगवान श्रीनृसिंह प्रकट होऊन एक विशेष वर देताना म्हणतात,
भो भो भक्तवरा: सर्वे श्रृणुध्वं वरमुत्तमम् ।
अहं भक्तपराधीनो अन्येषामतिदुर्लभ: ॥
" माझ्या सर्व श्रेष्ठ भक्तांनो, माझा उत्तम वरप्रसाद ऐका, मी माझ्या भक्तांच्या आधीन आहे, प्राप्त करून घ्यायला इतरांसाठी मात्र मी अत्यंत अवघड आहे  ! " येथे प्रत्यक्ष भगवान श्रीनृसिंहच आपल्या अवताराचे मार्मिक रहस्य स्वमुखाने सांगत आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउली या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
ऐसा अवतार नरहरी स्तंभामाझारी ।
भक्तां परोपरी धरी रूपें ॥१॥
धरूनिया महीत्व जाला नृसिंहरूप ।
वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु ।
वर्ण सारङ्गधरू निजरूप ॥३॥
" भक्तांच्या भल्यासाठीच हा नरहरी अवतार स्तंभामधून प्रकट झाला. अत्यंत भव्य-दिव्य अशा नृसिंह रूपात प्रकटलेले हे हरितत्त्व दुसरे तिसरे काही नसून वेदांनाही ज्याचा थांग कधी लागला नाही तेच साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहे. सकलकलानिधी भगवान श्रीकृष्ण हेच निजरूपातूनच पुन्हा श्रीनृसिंह झालेले आहेत. तेच माझे मायबाप, माझे परमहितैषी श्रीसद्गुरु देखील आहेत ! "
आपण गेले नऊ दिवस ज्या श्रीनृसिंह भगवंतांची ही शब्दपूजा बांधत आहोत, ते अहेतुकदयानिधी, भक्तहृत्कमलविहारी श्रीनृसिंहप्रभू या लेकुरवाचेने अर्पिलेल्या भातुकलीच्या नैवेद्याने संतुष्ट होऊन आपल्यावर कृपाप्रसाद करोत, हीच प्रेमभावना या शेवटच्या सांगतेच्या लेखात त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सर्वांच्या वतीने निवेदितो. गेले नऊ दिवस या निमित्ताने आपण कळत नकळत पण सतत भगवान श्रीनृसिंहदेवांच्या नित्य अनुसंधानातच आहोत, हे भाग्य काय थोडे आहे?
भगवान श्रीनृसिंहराज प्रभू हे किती दयाळू आहेत? याचे आजवर सर्वश्रेष्ठ अशा वेदांनाही वर्णन करणे शक्य झालेले नाही. श्रीनृसिंह पुराणात एक गमतीशीर कथा येते. एक आचारभ्रष्ट झालेला ब्राह्मण एकदा तीव्र कामवासनेने एका स्त्रीला घेऊन जंगलात जातो. तेथे कामक्रीडेसाठी त्याला एक पडकी जागा सापडते. तो ती स्वच्छ करतो व आपला कार्यभाग साधतो. त्याच्या लक्षातही येत नाही की ती पडकी जागा हे प्राचीन नृसिंह मंदिर असते. तेवढ्यातच त्याला मृत्यू येतो. पण अशा पापी जीवाला न्यायला जेव्हा यमदूत येतात तेव्हा त्यांना तेथेच पुण्य पावन विष्णुदूतही आलेले दिसतात. त्या दोघां दूतांमध्ये संवाद होतो व ते विष्णुदूत सांगतात की, या पापी भक्ताचे सर्व पाप केवळ एकदा नृसिंह मंदिराची स्वच्छता केल्याने भगवंतांनी नष्ट केलेले अाहे. तसेच त्याला विष्णुलोकाला आणण्याची भगवंतांची आज्ञाही आहे. तेव्हापासूनच नृसिंह उपासनेत मंदिराची स्वच्छता हा एक प्रभावी सेवा प्रकार रूढ झालेला आहे. आवळा घेऊन कोहळा देण्याचाच हा प्रकार नाही का? अल्पशा स्वार्थप्रेरित सेवेनेही भगवान श्रीनृसिंह संतुष्ट होऊन किती भरभरून फळ देतात पाहा. म्हणूनच त्यांच्याठायी विलसणा-या याच अद्वितीय करुणारसपूर्ण स्वभावाचे सर्व संत वारंवार वर्णन करतात.
आज त्या परमकारुणिक श्रीनरहरी अवताराची जयंती आहे. आजच्या सूर्यास्ताला हे करुणाब्रह्म पुन्हा अवतरणार आहे, आपल्यावर अपरंपार कृपावर्षाव करण्यासाठी ! म्हणून त्यांना अतिप्रिय असणा-या त्यांच्या सप्रेम स्मरणात आपण रममाण होऊया व श्रीनृसिंहजन्माचा आनंदोत्सव साजरा करूया.
आपल्या या लेखमालेचे शीर्षक ही भगवान श्रीमाउलींची एक ओवी आहे. त्यात ते भक्तवर प्रल्हादांची भगवंतांच्या तोंडून महती गातात की, त्या माझ्या लाडक्या भक्तासाठीच केवळ मी हे रूप धारण केलेले आहे. माझे हे नृसिंहरूप ' लेणे ' म्हणजेच अलंकार आहे. तोही मी माझ्या भक्ताचे माहात्म्य वाढविण्यासाठीच घातलाय. सुंदर दागिन्यांनी जशी मूळच्या सौंदर्यात आणखी वाढ होते, तसे या नृसिंहरूपामुळे षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीभगवंतांच्या गुणगणांमध्ये भक्तवात्सल्य या थोर गुणाचा प्रकर्षाने समावेश होऊन देवांचे गुणसौंदर्य आणखी वाढलेले आहे.
आईच्या प्रेमावर खरा हक्क तिच्या अबोध बाळाचाच असतो. तसे या भगवंतांच्या प्रेमावर तुम्हां आम्हां भक्तांचाच खरा हक्क आहे, फक्त आपण सर्वार्थाने आईला शरण जाऊन, ती ठेवेल तसे राहणारे, केवळ तिचीच आस असणारे बालक व्हायला हवे. हेच बालकत्व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांनी निरंतर जपले म्हणून अनावर, अपार असे उग्रभीषण नृसिंह भगवंत कायमचे त्यांचेच होऊन राहिले. ' प्रल्हादवरद ' असे नाव ते भगवंत आजही अभिमानाने मिरवीत आहेत. भक्तीचे अलौकिक श्रेष्ठत्व यापरते काय आणिक सांगणार?
आजच्या या पावन पर्वावर भक्ताग्रणी श्रीप्रल्हादजींच्या श्रीचरणीं आपण सर्वजण एकच मागणे मागूया की, " देव आपलासा कसा करावा? याचे यथार्थ ज्ञान आपण  कृपापूर्वक आमच्या हृदयात प्रतिष्ठापित करावे व भक्तकरुणाकर श्रीनृसिंह भगवंतांचा खरा आविर्भाव आमच्या हृदयकोशात करवून त्यांना कायमचे तेथेच स्थिर करावे. आपण त्यांच्यासाठी आहात व ते आपल्यासाठीच आहेत, म्हणून ते आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. तेव्हा आमची दया येऊ द्यावी व आम्हांलाही तुमच्यासारखी " नृसिंहजयंती " लवकरात लवकर साजरी करण्याची सुवर्णसंधी प्रदान करावी  !"
नृसिंहकवचात भगवान श्रीशंकर म्हणतात,
कुतो भीति: कुतो मृत्यु: कुतस्तस्य दरिद्रता ।
मृत्योर्मृत्यु: रमानाथो यस्य नाथो नृकेसरी ॥
भगवान श्रीनृसिंहांच्या भक्तांना ना मृत्यूची भीती ना दारिद्र्याची. मृत्यूचाही मृत्यू असणारे भगवान श्रीनृसिंह ज्यांचे स्वामी आहेत, त्यांच्या भाग्याची तुलना कशाशी करणार?
म्हणूनच आजच्या या नृसिंहजयंती पर्वावर श्रीसद्गुरुकृपेने गेले नऊ दिवस निर्माण झालेली ही नवविधा भक्तीरूपी सुगंधी श्वेत पुष्पे परमप्रेमादरे भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या श्रीचरणीं त्यांच्याच पावन नामाच्या गजरात समर्पूया व आत्मनिवेदन साधून धन्य होऊया  आणि ज्ञानी ऋषींनी स्तवराजात मागितलेलाच वरप्रसाद मागून भगवान श्रीनरहरीरायांच्या परममंगलमय श्रीचरणीं तुलसीदल रूपाने कायमचे विसावूया !!
यदि नोऽसि प्रसन्नस्त्वं देवदेव कृपानिधे ।
त्वमेव नितरां देहि त्वयि भक्तिं दृढां प्रभो ॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!