flairkarts

Thursday, 11 May 2023

पातं योग साधनपाद भाग ८ *वैराग्य सूर्याचा उदय होण्यापूर्वीचा उष:काल* माणसाच्या मनाला अविद्या , अस्मिता , राग , द्वेष आणि अभिनिवेश या प्रकारात मोडणारे क्लेश होऊ लागले की , तो अस्वस्थ होतो कारण चार प्रकारच्या अतृप्त वासना त्याची मनःशांती घालवून टाकतात. त्याबद्दल मुनी आपण पहात असलेल्या चौथ्या सूत्रात असं सांगतात की , *अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्॥४॥* म्हणजे , अस्मिता आणि इतर चार क्लेश प्रसुप्त , तनु , विच्छिन्न किंवा उदार या चार अवस्थांपैकी कोणत्या तरी एका अवस्थेत असतात. त्यापैकी उदार अवस्थेत असलेल्या वासनांच्या पूर्तीसाठी कोणताही अडथळा नसल्याने त्यादृष्टीने कर्म करत असताना वासनेच्या मुळाशी शारीरिक , मानसिक , बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी चार प्रकारची मूल्ये असतात. मनुष्य सोडून इतर योनीतील कर्मे शारीरिक मूल्यावर आधारित असतात. मनुष्य योनीत शारीरिक आणि मानसिक म्हणजे भावभावनावर आधारित अशी दोन्ही मूल्ये असतात.या दोन्ही मूल्यात मतभेद होत असतात. ते मिटवण्यासाठी बौद्धिक मूल्याच्या आधारे कर्म करण्याबाबत निर्णय घेतला जातो. तसेच बौद्धिक मूल्ये इंद्रिय सुखांच्या कल्पनाही विकसित करत असतात. बौद्धिक मूल्याच्या आधारे इंद्रियसुखाच्या कल्पनात आणि साधनात कितीही वाढ झाली तरी माणसाची भोगलालसा वाढतच जाते त्यामुळे त्याची मानसिक अशांतता कायम राहते. मानसिक अशांतता कायम राहण्याचे कारण असे की , त्याला विषयसुखाची अतोनात आवड असते आणि त्याचे मन त्याकडे सहजी ओढले जाते. परंतु काही सामाजिक नीतिनियम पाळायचे म्हणून , तसेच लोक काय म्हणतील या भीतीने त्याला त्याच्या अनावर भोगवासनाना आणि काम , क्रोध इत्यादि मनोविकारांना लगाम घालावा लागतो पण हे त्याने नाईलाजाने केलेले असते. अशाप्रकारे दडपून ठेवलेल्या वासनाना विच्छिन्न वासना म्हणतात. त्या तशाच दीर्घकाळ राहिल्या म्हणजे त्या तनु अवस्थेत जाऊन क्षीण झाल्यामुळे , मनुष्याच्या लक्षातही रहात नाहीत. तरीही त्या वासनांचा माणसाच्या मनावर परिणाम होत राहतो. हा परिणाम वाढत गेल्यास कालांतराने असा मनुष्य मनोविकारांची शिकार होतो. सुधारलेल्या पण भोगाची तीव्र इच्छा असलेल्या समाजात आत्महत्या करणारे , वेडपट , गुन्हेगारी प्रवृत्तीचे , असमाधानी लोक वाढत असतात ते याच कारणामुळे ! त्यांच्यातील भोगवासना तर वाढत्या असतात पण सामाजिक , नैतिक दडपणामुळे त्या दबल्या जातात आणि त्याचा परिणाम मनोविकृतीत होतो. अंतःकरणाच्या विकासाचा असा प्रवास सुरू असताना मनुष्याची बुद्धी एव्हढी विकसित होते की , त्याला अध्यात्मिक मूल्ये स्फुरू लागतात. त्याआधी तो स्वतःचे निरीक्षण करू लागतो. त्यावेळी त्याच्या असे लक्षात येते की , कितीही भोग मिळाले तरी समाधान मिळत नाही , आता पुरे असे वाटत नाही. समाधान मिळावे म्हणून अधिक भोग घेतले तरी तृप्ती न होता अधिकाधिक भोग घ्यावेत असेच वाटत राहते. हे लक्षात येणे हेच पहिले अध्यात्मिक मूल्य होय. भोगाबाबतच्या अनुभवातून त्याचे हे मत दृढ होत जाते. पुढे असे मनात येते की , या जन्माप्रमाणे मागील , त्याच्या मागील अशा अनेक पूर्वीच्या जन्मात आपण असेच सुखोपभोग घेतले असणार तरीही समाधान काही वाटत नाही याचा अर्थ समाधान भोगात नसून त्यासाठी इतर काहीतरी प्रयत्न करणे आवश्यक आहे तरी त्यासाठी साधुसंतांचा सहवास करूयात , धर्मग्रंथ अभ्यासूयात असे मनुष्यास वाटू लागले की , त्याचा प्रवास भोगाकडून मोक्षाकडे सुरू झाला असे म्हणता येईल ! येथून पुढे जरी भोग वाट्याला आले तरी यातून आपले भले होणार नाही हे लक्षात येऊन तो नाईलाजाने जेव्हढे भोगावेच लागतील तेव्हढेच भोग , प्रारब्धानुसार त्याच्या वाट्याला आलेले आहेत असा विचार करून भोगतो. त्यातूनही एखाद्या भोगाबद्दल आकर्षण वाटले तर काय करणार माझ्या पूर्वकर्माचे संस्कार मला त्या विषयाकडे खेचत आहेत अशी खंत त्याला वाटते. मनात असे क्लेशदायक विचार येणे हा चित्तात वैराग्य सूर्याचा उदय होण्यापूर्वीचा उष:काल होय. यापूर्वी अनेक भोगवासना काही ना काही कारणाने दडपल्या गेलेल्या असतात आणि त्याबद्दल मन चडफडत असते. ही भोगवासना अधिक प्रबळ झाली तर काहीवेळा क्रोध , मत्सर आदि मनोविकारांचा सामनाही करावा लागतो पण जसजशी अध्यात्मिक मूल्ये मनात रुजून जोम धरू लागतात त्याप्रमाणात मनोविकार अवरण्यातच आपले कल्याण आहे हा विचार प्रबळ होत जातो आणि इंद्रियांचा व मनाचा संयम मनुष्य स्वेच्छेने करू लागतो. क्रमशः

No comments:

Post a Comment